दसरा आणि पाठोपाठ येणारी दिवाळी.. आता खरे नटण्या- मुरडण्याचे दिवस सुरू झाले आहेत. या फेस्टिव्ह सीझनमध्ये अर्थातच आपण ट्रॅडिशनल वेअरला प्राधान्य देतो. पण हल्ली जमाना आहे फ्युजनचा. तुमच्या पेहरावाला साजेसा मेक-अपही हवा. नुसतेच ट्रेण्डी कपडे असतील तर लूक ट्रेण्डी बनत नाही. त्यासाठी देत आहोत या सीझनमधले मेक-अपचे टॉप ५ लूक्स..

मिनिमल इज मोस्ट
कमीत कमी मेक-अप हा ट्रेण्ड आहे. चेहऱ्यावरच्या फाइन लाइन्स लपवण्यासाठी सर्वप्रथम कन्सिलरचा उपयोग करावा. कोल पेन्सिल घेऊन डोळ्यांच्या आतल्या तसंच बाहेरच्या कडांना ठळक स्ट्रोक्स मारावेत. चेहऱ्यावरचा थकवा दिसू नये यासाठी व्हॉल्युमिनायिझग मस्कारा वापरावा. चमकते ओठ नेहमीच आकर्षक दिसतात. सर्वात शेवटी ओठांना न्यूट्रल किंवा पिंक शेडची लिपस्टिक लावावी.

ड्रॅमॅटिक आइज
संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी मेकअप असेल तर डोळे जितके स्मोकी दिसतील तितके उत्तम. परफेक्ट स्मोकी आइज इफेक्टसाठी त्याला साजेशी आयशॅडो वापरा. बहुसंख्य भारतीयांचे डोळे काळे किंवा तपकिरी असल्याने सोनेरी, तपकिरी, गडद काळा आणि करडा या रंगाच्या आयशॅडोज वापरणं उत्तम. हा लूक झटपट मिळवायचा असेल तर वरच्या पापणीवर या रंगाच्या आय पेन्सिलने आतल्या बाजूकडून बाहेरच्या बाजूला जाणारी जाड रेष आखावी. बाहेरच्या बाजूला ती थोडी पुसावी. हा लूक पूर्ण करण्यासाठी खालच्या पापणीवरही हीच क्रिया करावी.

हायलाइट बेस्ट फीचर
तुमच्या चेहऱ्याचं सगळ्यात चांगलं फीचर ठळक करायचं. म्हणजे डोळे हे तुमचं सर्वात चांगलं फीचर असल्याचं वाटत असेल तर त्यांना पॉप इफेक्ट द्यावा. लूक अधिक छान बनवण्यासाठी डोळ्यांचा मेकअप थोडा आणखी पुढे न्यावा. तुमच्याकडे ट्रान्सल्युसंट पावडर असेल तर ती मस्काराच्या दोन कोट्सदरम्यान लावावी. त्यामुळे पापण्या छान गडद दिसतील. ओठांना अधिक लक्षवेधी करायचं असेल तर गडद शेडची लिपस्टिक वापरावी. एकंदरीत चेहरा भरीव दिसण्यासाठी गुलाबी किंवा पीच रंगाच्या ब्लशचा वापर करावा. त्यामुळे चीक बोन्स उठून दिसतील.

ट्रॅडिशनल लूक
या उत्सवी काळात आपण पारंपरिक कपडे घालणं जास्त पसंत करतो. त्यामुळे आपला मेकअपही त्याला साजेसा हवा. हा मेकअप कपडय़ांशी मेळ खाणारा हवा. साडी किंवा सलवार सूट खूप झकपक असेल तर मेकअप साधा आणि कमीत कमी ठेवा. ड्रेस साधा असेल तर मेक-अप गडद असायला हवा. तर फेस्टिव्ह लूक येईल. कोणत्याही कपडय़ांवर शोभून दिसणारा न्यूट्रल लूक साधायचा असेल तर आयलिडवर सोनेरी रंग लावा आणि डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूला गडद तपकिरी रंग लावावा, जो बाहेरच्या दिशेला झुकलेला असेल. त्यामुळे डोळ्यांचा आकार अधिक उठावदार बनेल. वरच्या पापणीला विंग लायनर लावावा आणि खालच्या पापणीवर काजळाची गडद रेघ काढावी. आणखी पारंपरिक दिसण्यासाठी टिकली, बिंदी लावावी.

नॅचरल लूक
अनेक जणींना न्यूड लूक खूप आवडतो. डोळ्यांना गुलाबी आणि जांभळ्या अशा पेस्टल शेड्स लावून चेहरा आणखी तजेलदार बनवता येतो. ओठांना हलक्या नािरगी रंगाची लिपस्टिक लावावी आणि गालांनाही तोच रंग द्यावा जेणेकरून रंगाचा एक छान प्रभाव दिसून येईल. या सर्व लूक्सना मस्कारा आणि फाऊंडेशनची जोड द्यावी. एचडी फाऊंडेशन्स आणि एअरब्रशचा वापर करावा.
(सौजन्य :व्ही. कर्पागमबिगई, नॅचरल्स )