शिस्तीतल्या स्ट्राइप्सची फॅशन

या स्ट्राइप्स जितक्या युनिव्हर्सल, प्लेफुल असतात, तितक्याच शिस्तप्रियही असतात.

प्रिंट्स हा कपडय़ांमधील अगदी जिव्हाळ्याचा विषय. भौमितिक, फ्लोरल, पेझली, फंकी, फ्रीहॅण्ड, अबस्ट्रॅक्ट नाव घ्याल तितक्या वेगवेगळ्या स्वरूपाची प्रिंट्स कपडय़ांवर पाहायला मिळतात. साध्या बुट्टय़ांपासून, उभ्या-आडव्या पट्टय़ांपासून एखाद्या प्रथितयश चित्रकाराच्या पेंटिंगपर्यंत सगळं या प्रिंट्सच्या माध्यमातून कपडय़ांवर उमटलेलं पाहायला मिळतं. यातील काही प्रिंट्स बहुढंगी किंवा व्हर्सटाइल असतात. लिंग, वय, स्वभाव, प्रोफेशन यांचं बंधन झुगारून ती प्रिंट्स प्रत्येकाच्या कपडय़ांवर अगदी सहज विराजमान होतात. अशीच एक पॉप्युलर प्रिंट म्हणजे ‘स्ट्राइप्स’.

थोडक्यात सांगायचे झाले तर पट्टे किंवा रेघा. बोलून बोलून यात किती विविधता आणता येईल? आडवे, उभे किंवा तिरके पट्टे फारतर त्यात वेगवेगळे रंग टाकू शकतो. पण हे साधेसे वाटणारे स्ट्राइप्स सगळ्या प्रकारच्या कपडय़ांवर शोभून दिसतात. पुरुषांच्या फॉर्मल्सवर तर आवर्जून असतातच, पण स्त्रियांनाही स्ट्राइप्स हवेहवेसे वाटतात. बरं यांचं वैशिष्टय़ म्हणजे हे फक्त शोभिवंत नसतात, तर उपयुक्तसुद्धा असतात. उभ्या स्ट्राइप्सनी शरीराचा उंचपणा जाणवतो, तर आडव्या स्ट्राइप्स शरीराचे कव्‍‌र्ह फोकसमध्ये आणतात. तिरक्या स्ट्राइप्सची मजाच वेगळी आहे. ते नीट घातले तर त्यांच्याइतका सेक्सी लुक कोणीच देऊ  शकणार नाही. या सगळ्यांचा परमबिंदू म्हणजे दोन वेगवेगळ्या स्ट्राइप्सचे एकत्र येऊन तयार होणारे ‘चेक्स’. यांच्या बाबतीत तुम्ही कधी चुकूच शकत नाही.  ‘फॉर्मल्समध्ये प्लेन शर्ट घालायचा नसेल तर स्ट्राइप्सशिवाय पर्याय नाही,’, या समजुतीपोटी पुरुषांनी या बहुगुणी स्ट्राइप्सना ओव्हरहाइप केलंय खरं, पण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण स्ट्राइप्सचा चार्म कधीच जुना होत नाही. त्यामुळे स्ट्राइप्स ‘आउट ऑफ फॅशन’ जाण्याचा प्रश्नच नसतो मुळी. यंदाच्या सीझनमध्ये तर मुख्य फोकस या स्ट्राइप्सवर आहे. इतका की कुर्ता, शर्ट्सोबतच थेट गाउनपर्यंत स्ट्राइप्सचा विचार झालेला पाहायला मिळतोय.

स्ट्राइप्सचं इतकं कोडकौतुक ऐकून तुम्ही पटकन एखादा ड्रेस घ्यायला जाणार असाल, तर आधीच सावध करते. या स्ट्राइप्स जितक्या युनिव्हर्सल, प्लेफुल असतात, तितक्याच शिस्तप्रियही असतात. उगाचच त्यांच्याशी छेडछाड केलेली त्यांना खपत नाही. स्ट्राइप्स उपयुक्त असले, तरी त्यांना वापरायची एक पद्धती असते. त्याचं पालन तुम्ही केलंच पाहिजे. नाहीतर तुमचा लुक पूर्ण फसू शकतो. आडव्या स्ट्राइप्सचे कपडे हेव्हीवेट मुली वापरू शकत नाहीत, त्यामुळे त्या अधिकच जाडय़ा दिसतात हा गैरसमज जितका लोकमान्य झालाय तितकाच उभ्या स्ट्राइप्सनी बारीक आणि उंच दिसतो, हाही रूढ झालाय. पण खरं पाहायला गेलं तर उभ्या स्ट्राइप्सच्या ड्रेसमध्ये बारीक देहयष्टीची मुलगी अजूनच कृश दिसू शकते, तर आडव्या स्ट्राइप्स योग्य पद्धतीने घातल्यास तुमच्या शरीरातील बोल्डनेस ते फोकसमध्ये आणतात. थोडक्यात सांगायचं झालं, तर स्ट्राइप्स जेवणातील मिठाप्रमाणे आहेत. तुम्हाला जेवण चविष्ट बनवायला प्रत्येक पदार्थात त्यांची गरज असते, पण त्याचं प्रमाण कमी-अधिक झालं, की एकतर पदार्थ अळणी होतो किंवा खारट.

ब्लॅक अँड व्हाइट स्ट्राइप्स किंवा झेब्रा प्रिंट्स सध्या ट्रेण्डमध्ये आहेत. बोल्डनेसमध्ये यांची तुलना इतर कशासोबतच करता येणार नाही. मोठय़ा आडव्या लाइन्सचा फिशटेल गाऊन आणि त्याला मोठाला बो हा पन्नाशीच्या दशकातील महत्त्वाचा ट्रेण्ड होता. यंदा तो पुन्हा पाहायला मिळतो आहे. ब्लॅक अँड व्हाइट ड्रेस असल्याने फोकस म्हणून एखाद्या गडद रंगाची ज्युलरी किंवा बेल्ट याच्यासोबत सहज वापरता येतो. सध्या मोठय़ा आकाराच्या स्ट्राइप्स प्रामुख्याने पाहायला मिळताहेत. शिमर स्ट्राइपसुद्धा यंदा पाहायला मिळताहेत. विशेषत: सेल्फ-शाइन असलेल्या सिल्क, ब्रोकेड कापडात स्ट्राइप अजूनच खुलून दिसतात. अर्थातच हा ट्रेण्ड फॉलो करताना स्ट्राइप्स कुठे आणि कशा वापरता आहात याकडे लक्ष देणं गरजेचं असतं, तरच स्ट्राइप्सची खरी मजा अनुभवता येते.         ल्ल

स्ट्राइप्सच्या वापरासाठी टिप्स..

  • शर्ट, कुर्त्यांमध्ये स्ट्राइप्सचा वापर करून सेफ प्ले करायचा विचार यंदा टाळा. त्याऐवजी ड्रेस, स्कर्ट, पँटमध्ये स्ट्राइप्सचा वापर करून बघा. उभ्या पट्टय़ांचा पेन्सिल स्कर्ट किंवा स्ट्रेट पँट आणि प्लेन व्हाइट शर्ट हा नेहमीच्या फॉर्मल्सला उत्तम पर्याय ठरू शकतो. अर्थात मग त्याच्यासोबत जॅकेट वगैरे घालून स्ट्राइप्सवरचा फोकस बिघडवू नका. नाहीतर लुक फसेल.
  • आडव्या स्ट्राइप्सचा ड्रेस घालताना पट्टय़ांचे विभाजन बस्टलाइन, वेस्टलाइन, हिपलाइनवर व्यवस्थित होईल याची काळजी घ्या. तुम्ही हेवी बस्ट असाल आणि प्रिंटची आडवी रेष नेमकी बस्टवर आल्यास तुम्ही हेव्हीवेट दिसू शकता. अशा वेळी बारीक स्ट्राइप्सचा ड्रेस निवडा किंवा बस्टलाइनवर आडव्या प्लिट्स शिवून तिथला फोकस कमी करू शकता.
  • तुमचा बॉडीटाइप लीन असेल तर उभ्या पट्टय़ांचा फ्लेअर ड्रेसने बॉडीला बल्कीनेस देता येईल. त्यावर एखादं मस्त जॅकेटसुद्धा घेता येईल.
  • तिरक्या स्ट्राइप्स योग्य ठिकाणी तोडणे गरजेचं असतं. नाहीतर बॉडीशेप डिफाइन होत नाही. त्यामुळे शक्यतो शर्टामध्ये समोरच्या बाजूला दोन वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या स्ट्राइप्सनी तयार होणारा इंग्रजी ‘व्ही’ आकार पाहायला मिळतो. ड्रेसमध्येही वेस्टलाइनवर या लाइन्स तोडून वेगवेगळ्या दिशेला फिरवता येतात.
  • सेपरेट्स घालणार असाल तर स्ट्राइप्ससोबत शक्यतो न्यूट्रल शेड्स वापरा. बोल्ड शेडमुळे फोकस निश्चित न झाल्याने लुक बिघडू शकतो.
  • दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या स्ट्राइप्स एकत्र आणण्याचा प्रयत्न ड्रेसमध्ये शक्यतो करू नका. स्ट्राइप्स ड्रेसचा फोकस निश्चित करतात. त्यामुळे अशा प्रसंगी ड्रेसचा फोकस बिघडू शकतो.
  • पेअर शेप असाल तर आडव्या स्ट्राइप्सच्या शर्ट किंवा टय़ुनिकने शोल्डरचा ब्रॉडनेस फोकसमध्ये आणता येतो आणि बॉटमवेअर सटल कलरमध्ये घेऊन हिप्सवरचा फोकस कमी करता येतो. अ‍ॅपल शेप असाल तर मात्र याच्या विरुद्ध फॉम्र्युला. उभ्या स्ट्राइप्सनी शोल्डरचा ब्रॉडनेस कमी भासवता येऊ शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Wearहौस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Decent stripes fashion

ताज्या बातम्या