पारंपरिक जरतारी कशिदा

कच्छी एम्ब्रॉयडरी, बंजारा एम्ब्रॉयडरी अशी ट्रायबल एम्ब्रॉयडरी पाहता क्षणी डोळ्यात भरते.

भरतकाम, कशिदाकाम ही भारतातल्या जुन्या कलांपैकी एक. प्रांताप्रांतात वेगवेगळ्या कशिदाकामाची परंपरा आपल्याला दिसते. या पारंपरिक एम्ब्रॉयडरीची गंमत म्हणजे ती प्रत्येकीच्या आवडीनिवडीनुसार बदलते. मागच्या भागात आपण यातील काही एम्ब्रॉयडरीचे प्रकार पाहिले. ते खास करून भारताच्या ग्रामीण, आदिवासी भागांतील कला म्हणून येतात. त्यांची खासियत म्हणजे त्यातील अनियमितपणा, रॉनेस आणि रस्टिक लुक. पण सगळ्याच एम्ब्रॉयडरीज अशा नसतात. आपल्याकडे अत्यंत बारकाईने, नाजूकपणे पण तितक्याच प्रमाणबद्धतेने केले जाणारे एम्ब्रॉयडरीजचे प्रकारही आहेत. चिकनकारी, जरदोसी, फुलकारी ही यातली आपल्या परिचयाची काही नावं, पण यादी मोठी आहे.

कच्छी एम्ब्रॉयडरी, बंजारा एम्ब्रॉयडरी अशी ट्रायबल एम्ब्रॉयडरी पाहता क्षणी डोळ्यात भरते. आरसे, रंगीत खडे, शंख, ब्राइट रंग यामुळे ती चटकन लक्ष वेधून घेते. पण चिकनकारी, जरदोसीसारख्या बारीक एम्ब्रॉयडरीजची मजा त्यांच्यातील डिटेिलगमध्ये आहे, नजाकतीमध्ये आहे. लहानातील लहान आकारासाठी, नक्षीसाठी घेतलेल्या मेहनतीवर असते. आज आपण याच एम्ब्रॉयडरीची नजाकत उलगडणार आहोत.

काश्मिरी कशिदा : काश्मीरला गेलेला प्रत्येक पर्यटक काश्मिरी कशिदा केलेला कुर्ता, जॅकेट किंवा शाल घेतल्याशिवाय परतत नाही. एक साधंसं चेन स्टिच पण तेही किती सुंदर दिसू शकतं हे काश्मिरी कशिदा पाहिल्यावर लक्षात येतं. एकाच रंगाच्या विविध शेड्स आणि वैशिष्टय़पूर्ण फ्लोरल डिझाइन हे या कशिद्याचं वैशिष्टय़. वुलन कापड बेस म्हणून वापरल्याने या कपडय़ांना उबदारपणा मिळतो. शाल, कुर्ता, सलवार कमिज आणि जॅकेट्सवरील कशिदाकाम प्रसिद्ध आहे.

फुलकारी : फुल आणि कारी म्हणजे काम असा सोप्पा, सरळ अर्थ असलेली ही एम्ब्रॉयडरी पंजाबी स्त्रियांच्या जिवाभावाची. लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, नारंगी, निळा अशा ब्राइट रंगांचा वापर यात केला जातो. प्रामुख्याने या एम्ब्रॉयडरीमध्ये भौमितिक आकार पाहायला मिळतात. या एम्ब्रॉयडरीमध्ये टाक्यांची लांबी जास्त असते. बॉर्डर्स किंवा कित्येकदा संपूर्ण दुपट्टा या एम्ब्रॉयडरीने भरलेला असतो.

चिकनकारी : उत्तर प्रदेशातील चिकनकारी म्हणजे मुघलांची मक्तेदारी. नजाकतीमध्ये या एम्ब्रॉयडरीची सर कोणालाच नाही. ऑथेंटिक चिकनवर्कची खासियत म्हणजे सफेद मलमल कापडावर सफेद धाग्याने केलेली एम्ब्रॉयडरी. आता वर्णन वाचूनच कारागिराच्या डोळ्यांचे काय हाल होत असतील, याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. पण हे इतक्यावरच थांबत नाही, इतर एम्ब्रॉयडरीजप्रमाणे चिकनकारीमध्ये उणेपुरे दोन-तीन नाहीतर स्टिचिंगचे चाळीस प्रकार येतात. यातील तीस प्रकार सध्याच्या घडीला प्रचलित आहेत. यात फर्न्च क्नॉट, चेन स्टिच, श्ॉडो स्टिच, बटनहोल स्टिच यांचा समावेश आहे. जहांगीरची पत्नी नूरजहाँ हिने या एम्ब्रॉयडरीला जन्म दिल्याचं सांगितलं जातं. जाळी वर्क चिकनकारीमध्ये कलाकारीचा उत्तम नमुना मानलं जातं. जालीवर्क केलेलं मलमलचं कापड पाण्यावर ठेवल्यास कापड पूर्णपणे पारदर्शी होऊन पाण्यावर केवळ एम्ब्रॉयडरी दिसते.

कांथा एम्ब्रॉयडरी : रसगुल्ल्यासारखा गोड बंगाल त्यांच्या कांथा एम्ब्रॉयडरीसाठीही तितकाच ओळखला जातो. वरवर पाहायला गेलं, तर हा एम्ब्रॉयडरीचा सगळ्यात सोप्पा प्रकार. सरळ एका रेषेत टाकलेले टाके यात असतात, पण यांच्या कलेचा कस कापड दोन्ही बाजूने पाहिल्यावर उलगडतो. कारण कांथा एम्ब्रॉयडरी कापडाच्या दोन्ही बाजूला सारखीच दिसते. सुरुवातीला रजईच्या आवरणासाठी वापरली गेलेली ही एम्ब्रॉयडरी नंतर साडी, सलवार सूट, शाल यांच्यावरही आली.

कसुती वर्क : आपल्याकडील ठिपक्यांची रांगोळी तुमच्या साडीवर अवतरली तर कशी दिसेल? याचं उत्तर म्हणजे कसुती एम्ब्रॉयडरी. कर्नाटकमध्ये केली जाणारी ही एम्ब्रॉयडरी संपूर्ण भरीव नक्षीकाम भरण्याऐवजी त्याच्या आउटलाइनवरून फिरते. त्यामुळे ती रांगोळीसारखी दिसते. कांथाप्रमाणे ही एम्ब्रॉयडरीदेखील दोन्ही बाजूने सारखीच दिसते.

जरदोसी एम्ब्रॉयडरी : आता या एम्ब्रॉयडरीबद्दल फारसं बोलण्यासारखं काही नाही. एकेकाळी अस्सल सोने आणि चांदीची जरी वापरून केली जाणारी ही एम्ब्रॉयडरी मुघल, निजामांची शान होती. आजही बहुतेक ब्रायडल कपडय़ांवर जरदोसी पाहायला मिळते. आता मात्र यात प्लास्टिकच्या वायर वापरल्या जातात. त्यांना रंग मात्र सोनेरी किंवा चंदेरी असतो. सिल्कच्या कापडावर ही एम्ब्रॉयडरी प्रामुख्याने केली जाते. त्यामुळे तिची किंमत आपसूक वाढते. जरीसोबतच रंगीत खडे, स्टडचा वापरही यात होतो. कपडेच नाही तर शूज, बॅग्समध्येही जरदोसी वर्क पाहायला मिळते.

फुल पत्ती का काम : या एम्ब्रॉयडरीचं सगळं सार तिच्या नावातच आहे. उत्तर प्रदेशातील ही एम्ब्रॉयडरी पॅच वर्कचा उत्तम नमुना आहे. नावाप्रमाणेच विविध फुलं आणि पान हे या एम्ब्रॉयडरीतील नक्षी. यात बेस कापडाला वेगवेगळ्या रंगांच्या कापडाचे पॅचेस फुलांच्या आकारात जोडतात.

  • या एम्ब्रॉयडरी प्रामुख्याने ब्राइडल कपडय़ांमध्ये किंवा ट्रेडिशनल साडी, सलवार सूटमध्ये पाहायला मिळतात, पण थेट साडी घेण्यापेक्षा कांथा, कसुतीसारख्या एम्ब्रॉयडरीचे कापड घेऊन तुम्ही लेटेस्ट स्टाइलचा कुर्ता किंवा डे ड्रेस शिवू शकता.
  • शक्यतो हाताने एम्ब्रॉयडरी केलेल्या साडीचा ड्रेस बनविण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे एम्ब्रॉयडरीचा लुक जातो. त्याऐवजी लेटेस्ट स्टाइलचा ब्लाउज, जॅकेट किंवा केपसोबत साडी पेअरअप करून तिला नवीन लुक देता येईल.
  • हे कापड आणि त्यावरील एम्ब्रॉयडरी दिसायला सुंदर असले तरी हाताळण्यासाठी अतिशय नाजूक असते. कपडे धुताना विशेष काळजी घ्यावी लागते.

या एम्ब्रॉयडरीजमध्ये बारीक काम खूप असते. कित्येकदा एखादी साडी बनवायला दोन-तीन महिने किंवा त्याहून अधिक कालावधी लागतो. त्यामुळे सध्या या एम्ब्रॉयडरी मशीनवरसुद्धा केल्या जातात. पण मशीनवर्कला ती मजा नाही. म्हणूनच या एम्ब्रॉयडरीचे कपडे घेताना नीट तपासून घेणे गरजेचे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Wearहौस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Traditional embroidery

ताज्या बातम्या