शहराच्या सारसनगर भागातील गणेश बाळासाहेब सपाटे या तरुणाच्या खुनाच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी मंगळवारी पप्पू उर्फ प्रशांत वसंत देठे (वय ३०, रा. सनी पॅलेसमागे, पाईपलाईन रस्ता) याला अटक केली तर दुसरा संशयित गणेश उर्फ टिंग्या म्हसुदेव पोटे ( २८, रा. सारसनगर) याचा शोध सुरु केला आहे.
गणेश सपाटे याचा मृतदेह मंगळवारी सकाळी शहरातील नगर कॉलेजच्या मैदानालगतच्या काटवनात आढळला. त्याच्या डोक्यात कठीण वस्तुने मारहाण करण्यात आली होती तसेच बरगडीलाही दुखापत झालेली होती. त्याचा खून रविवारी रात्री झाला. त्यावेळी त्याच्याबरोबर टिंग्या व पप्पू असे दोघे होते. सपाटे विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात सन २००२ मध्ये खुनाचा तर सन २०१२ मध्ये कोतवालीत जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्य़ात सपाटे बरोबरच टिंग्याही आरोपी आहे असे पोलिसांनी सांगितले.
सपाटेचा खून नेमक्या कोणत्या कारणासाठी झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तत्कालिक वादातून खून झाला असावा, असा संशय तपासी अधिकारी व कोतवालीचे निरीक्षक हनपुडे पाटील यांनी व्यक्त केला. सपाटे, टिंग्या व पप्पू या तिघांनी रविवारी रात्री स्टेशन रस्त्यावरील क्लेरा ब्रुस शाळेच्या मैदानावर मद्यपान केले. नंतर गणेश व टिंग्या हे दोघे मोटारसायकलवरून सोलापूर रस्त्याकडे गेले. या रस्त्यालगतच कॉलेजचे मैदान आहे. याच रस्त्यावर गणेशची मोटारसायकल भिंगार कँप पोलिसांना बेवारस आढळली. ती कँप पोलिसांनी रविवारी रात्रीच ताब्यात घेतली होती, परंतु तोपर्यंत गणेशचा मृतदेह आढळला नव्हता, तो सोमवारी सकाळी मिळाला.