मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयाच्या आवारात घुसून सशस्त्र चोरटय़ांनी दरोडा घातला. दहा ते बारा दरोडेखोरांनी एक लाख ८९ हजारांचा ऐवज लुटून नेला. त्यांनी केलेल्या हल्ल्यात एक शिक्षक जखमी झाला. पहाटेच्या सुमारास पडलेल्या या दरोडय़ाच्या गुन्ह्य़ाची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे.
सुमारे पन्नास एकर क्षेत्राच्या नवोदय विद्यालयाच्या आवाराच्या लोखंडी तारांचे कुंपण तोडून दरोडेखोरांनी आत प्रवेश केला. तोंडाला काळे रुमाल लावलेल्या या दरोडेखोरांनी प्रारंभी लक्ष्मण जनार्दन पाते (वय ३५, मूळ रा. पाथरी, जि. परभणी) या शिक्षकाच्या घराचा दरवाजा तोडला आणि घरात घुसून त्यांच्या कुटुंबीयांना तलवारीचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. शेजारी राहणारे शिक्षक के. वसंतकुमार हे मदतीसाठी धावून आले व त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. दरोडेखोरांनी पाते यांच्या पत्नी रुक्मिणी (वय २८) यांच्या अंगातील सोन्याचे दागिने काढून घेतले. नंतर शेजारी राहणारे उपप्राचार्य प्रदीप विश्वनाथ वाणी यांच्या घरातही घुसून दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. वाणी कुटुंबीयांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. दोन्ही घरांतील एकूण एक लाख ८९ हजारांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लुटण्यात आला. सोबत दोन मोबाइलही दरोडेखोरांनी लांबविले. दरम्यान, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. राजेश प्रधान यांनी पोखरापूरच्या नवोदय विद्यालयात भेट देऊन दरोडय़ाच्या पद्धतीचे निरीक्षण केले. गुन्ह्य़ाचा माग काढण्यासाठी श्वानपथकाची व फिंगर प्रिंट पथकाची मदत घेण्यात आली. श्वान एक किलो मीटर अंतरापर्यंत जाऊन एकाच ठिकाणी घुटमळत राहिले.