जिल्ह्य़ातील अठरा साखर कारखान्यांपैकी दहा कारखान्यांनी १५ नोव्हेंबपर्यंत ३ लाख ३६ हजार ४४५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून २ लाख ५६ हजार ५३५ पोती साखर उत्पादन झाले आहे. सर्वाधिक म्हणजे ६३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप मुळा कारखान्याने केले आहे. जिल्ह्य़ाचा साखर उतारा ९.३९ इतका आहे. पुढील हंगामात १८ पैकी काही कारखानेच सुरू होण्याची शक्यता आहे. ऊस नसल्याने चालू व पुढील वर्षांत साखर कारखान्यांचे आर्थिक संतुलन बिघडेल, असा साखर उद्योगातील जाणकारांचा अंदाज आहे.
सरपंचपदी यशोदा आहिरे
देर्डे-कोऱ्हाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोल्हे गटाच्या यशोदाबाई मगन आहिरे, तर उपसरपंचपदी रूपाली राजेश डुबे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत स्वाभिमानी विकास आघाडीच्या अनेक उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या; त्यात शंकरराव कोल्हे व बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालील जनसेवा पॅनेलचे ९ पैकी ६ उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांमध्ये अर्चना डुबे, प्रतापराव डुबे, उमाकांत शिलेदार, रमेश कोल्हे यांचा समावेश आहे. आगामी काळात विकासाची कामे करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवू, असे आश्वासन सरपंच यशोदाबाई आहिरे यांनी दिले आहे.
सोनई ठाण्यात वाहतूक पोलीसच नाही
सोनई पोलीस स्टेशनमध्ये वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसल्याने सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक पोलिसांची उपस्थिती दिसली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब साबरे यांनी दिला आहे. सोनई पोलीस स्टेशनजवळच महाविद्यालये, मुलींचे वसतिगृह, शाळा असल्याने रस्त्यावर रहदारी असते, त्यामुळे वाहतूक नियंत्रणाची गरज आहे. घोडेगाव येथे दर शुक्रवारी जनावरांचा बाजार नगर-औरंगाबाद रस्त्यावर भरतो, त्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. सोनईचे पोलीस निरीक्षक वाहतूक पोलीस म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे हप्ता मागतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रणाचे काम घ्यायला कुणी तयार नाही, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.
व्यंकटेश पतसंस्थेच्या चौकशीचे आदेश
व्यंकटेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश नेवासे येथील सहायक निबंधकांनी नुकतेच दिले आहेत. पतसंस्थेच्या चौकशीसाठी अधिकारी म्हणून आर. बी. वाघमोडे यांची नियुक्ती केली आहे. श्रावणबाळ माता-पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र एकनाथ निंबाळकर यांनी केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अपंग विकास महासंघाच्या उपाध्यक्षपदी वावरेनगर उत्तर विभागातील नेवासे तालुका अपंग महासंघाच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते संतोष वावरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र शेडगे यांनी दिली. वावरे यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे. विविध स्तरातून त्यांचे या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे.