गुन्हेगारी कारवायांना आळा घालावा या मागणीसाठी खैरी निमगाव येथे बोलावलेल्या ग्रामसभेत गुन्हेगारांनी हैदोस घातला. त्यांनी केलेल्या मारहाणीत राष्ट्रवादीचे दोघे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. बंदोबस्त मागूनही पोलीस नेहमीप्रमाणे घटना घडल्यानंतर आले. तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध दंगल व मारहाणप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
खैरी निमगाव येथे गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. रास्ता लूट, दरोडा, गावठी कट्टे, चोऱ्या व दंगल प्रकरणातील अनेक आरोपी गावात वास्तव्य करून आहेत. काही दिवसांपूर्वी साईनाथ बनकर या तरुणास मारहाण करण्यात आली होती. त्या वेळी आरोपींविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करणारे निवेदन देण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून निवेदनावर सह्या असणा-या लोकांना गुन्हेगार रस्त्यात अडवून मारहाण करीत होते, पण दहशतीमुळे कुणी फिर्याद देण्यास तयार झाले नाही. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश भाकरे हे मारहाण झालेल्या लोकांना भेटण्यासाठी गेले. त्याचा राग येऊन भाकरे यांना गणेश रावसाहेब शेजूळ व सागर अप्पासाहेब दुशिंग या दोघांनी रस्त्यात अडवून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. भाकरे यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता साळुंके-ठाकरे यांनाही माहिती दिली होती, पण तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास पुंडकर व हवालदार सिकंदर शेख यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती.
आज सकाळी दहाच्या सुमारास उपसरपंच शिवाजी शेजूळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा बोलावण्यात आली होती. सभेस आदिनाथ झुराळे, सुंदरभान भागडे, लहानू शेजूळ, तुकाराम काजळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. या वेळी सात ते आठ गुन्हेगार ग्रामसभेत आले. त्यांनी ग्रामसभेलाच विरोध करून भाकरे यांच्यावर विक्रम नारायण परदेशी याने चॉपरने हल्ला केला. हल्लेखोरांकडे तलवारी, गुप्त्या व जांबिये होते. त्यांनी हल्ला करताच अन्य पाच ते सात गुन्हेगारांनी ग्रामसभेत हैदोस सुरू करून ग्रामसभा उधळून लावली. दहशतीमुळे गावकरी पळून गेले. या वेळी तुळशीराम भाकरे हे मधे पडले. त्यांनाही मारहाण करण्यात आली. नंतर पोलिसात तक्रार केली तर जीवे मारून टाकू, आमच्याकडे गावठी कट्टे आहेत, एका हॉटेलवर आम्ही केलेला खून पोलिसांच्या मदतीने दडपला, आता तुमचाही बेत करू, अशी धमकी देऊन आरोपी निघून गेले.
गावक-यांनी भाकरे बंधूंना कामगार रुग्णालयात दाखल केले. भाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नीलेश बाळासाहेब परदेशी, दुर्गा बाळासाहेब परदेशी, विक्रम नारायण परदेशी, विजय मदनसिंग परदेशी, भक्ती भागवत काळे, सागर अप्पासाहेब दुशिंग व दौलत सिंग या सात जणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ग्रामसभेसाठी बंदोबस्त मागविला होता. पण तो पोलिसांनी दिला नाही, अशी तक्रार उपसरपंच शेजूळ यांनी केली आहे.