कल्याण-डोंबिवली शहरातील रस्ते सिंगापुरी रस्त्यांसारखे व्हावे म्हणून ‘उदात्त’ हेतूने पालिकेच्या स्थायी समितीने गेल्या वर्षभरात रस्त्यांचे डांबरीकरण, मजबुतीकरण आणि डागडुजीसाठी तब्बल २१६ कोटी ८९ लाख १९ हजार रुपये मंजूर केले आहेत. स्थायी समितीच्या ५४ ठरावांच्या माध्यमातून ५१ रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या रस्त्यांमधील ९ कामे पूर्ण झाली असून ४२ कामे चालू स्थितीत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोटीची उड्डाणे घेऊन तयार करण्यात आलेल्या या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या डागडुजीचे पैसे गेले कुठे असा सवाल नागरिक विचारीत आहेत.
पालिकेच्या टिटवाळ्यापासून ते डोंबिवलीतील कोपपर्यंतच्या, खडेगोळवलीपासून गंधारेपर्यंतच्या सात प्रभागांमधील रस्ते, डागडुजी, डांबरीकरण कामासाठी स्थायी समितीने २६ कोटी ३२ लाख ३४ हजार ६५६ रुपये खर्च केले आहेत. या सात प्रभागांमधील रस्त्यांची नऊ कामे पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला असून उर्वरित दोन कामे चालू आहेत असे म्हटले आहे. सात ते आठ महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्त्यांची गेल्या दहा दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चाळण केली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामाचा दर्जा पावसाने उघडा पाडला आहे. ठेकेदाराचे कामगार भर पावसात चुनखडी, ओबडधोबड खडी आणि मूठभर सिमेंटच्या गिलाव्याने खड्डे भरण्याचे काम करीत आहेत. या कामांवर ठेकेदार किंवा पालिकेच्या कोणत्याही अभियंत्याचे लक्ष नसल्याचे बोलले जाते.
मनसेचे इरफान शेख यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमधून पालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खर्चाची माहिती दिली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून प्रशासन ही माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते, असे शेख यांनी सांगितले.
प्रभागांमधील रस्त्यांवर २६ कोटी खर्च केल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी सर्वच प्रभागांमधील काही रस्त्यांची अवस्था अडगळीत असलेल्या एका आदिवासी वाडीवरील रस्त्यासारखी झाली आहे. स्थानिक नगरसेवक, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने रस्त्यावरील खर्च केला जातो. त्यामुळे खड्डय़ात माती आहे की खडी याचा विचार नगरसेवकांकडून केला जात नाही. या सगळ्या अनागोंदीमुळे करदात्या जनतेचे पैसे खड्डयात जात असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. डोंबिवलीत टिळक चौक ते शेलार नाका, कोपर पूल, डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग कार्यालयासमोरील संत ज्ञानेश्वर चौक ते ‘बीएसएनएल’ कार्यालय हा सुमारे तीनशे फूट रस्त्याचा तुकडा रस्त्यात आहे की मातीत आहे हेच कळत नसल्याचे दिसून येते. कल्याणमधील काटे मानिवली, तिसगाव नाका, मलंग रस्ता, पश्चिमेत मुरबाड रस्ता, गंधारे रस्ता तसेच शहरांतर्गत रस्त्यांची वाताहत झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
कल्याण-डोंबिवलीत डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामधील २५ टक्के कामे शिल्लक आहेत. खड्डे भरण्यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद आहे. कंपन्यांनी खोदलेल्या चऱ्या भरण्यासाठी ८ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. कामांचा निकृष्ट दर्जा, अभियंते, ठेकेदारांची केबीनमध्ये बसून कामे पूर्ण करून घेण्याची क्षमता रस्त्यांच्या खराबीला कारणीभूत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी केली आहे.