प्रेमसंबंधात अडथळा तसेच जमिनीच्या वादातून नांदेड जिल्ह्यातील युवकाला त्याच्याच साथीदाराने शिर्डीत साईदर्शनाला आणून पाण्याच्या टाकीत ढकलून त्याचा खून केला. शिर्डी पोलिसांनी याबाबत तिघांना अटक केली. येथील न्यायालयाने त्यांना ३० ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मृत तरुणाचे नाव अनिल लक्ष्मण िशदे (वय २५, राहणार गोयेगाव, जिल्हा नांदेड) असे नाव आहे. तो मित्रासमवेत साईदर्शनाला आला होता. साईबाबा रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गटारीच्या पाण्याच्या टाकीत एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. पोलिसांनी याबाबत सुरुवातीला आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. मृत अनिल याचे मित्र घरी पोहोचले. त्यांनी सांगितले, की अनिल हा शिर्डीत चुकल्याने त्याची व आमची भेट झाली नाही. त्यानंतर अनिल याचे नातेवाईक शोध घेत शिर्डीत आले. पोलिसांनी त्यांना सदर मृत तरुणाचे वर्णन सांगताच त्यांनी अनिलचा मृतदेह ओळखला. नंतर मात्र चांदू ऊर्फ आप्या कौठकर (वय २२), राजरतन लक्ष्मण तूपसागरे (वय १९) आणि साईनाथ तुकाराम येमलवार (वय १९, तिघेही राहणार गोयेगाव) यांना अटक करून पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली.
मृत अनिल याच्या बहिणीशी आरोपी चंदू ऊर्फ आप्या कौठकर याचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला अनिल हा सातत्याने अडथळा निर्माण करीत होता, तर दुसरा आरोपी राजरतन लक्ष्मण तूपसागरे याचा मृत अनिलशी जमिनीचा वाद होता. या दोघांनी अनिलचा कायमस्वरूपी काटा काढण्याच्या उद्देशाने अनिल यास शिर्डी येथे आणून पाण्याच्या टाकीत ढकलून त्याचा खून केला. अनिल याचे वडील लक्ष्मण िशदे यांनी या तरुणांवर संशय व्यक्त केला होता.