असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स सोलापूरच्या वतीने येत्या ८, ९ व १० फेब्रुवारी रोजी होम मैदानावर बांधकाम व अंतर्गत सजावटीविषयक ‘स्थापत्य-२०१३’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यंदाचे सातवे वर्ष आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील सर्व व्यावसायिकांसाठी व त्यातून होणाऱ्या सोलापूरच्या विकासासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यात स्थापत्य अभियंत्यांसह तंत्रज्ञ, बिल्डर्स, विकासक, कंत्राटदार, व्यावसायिक, स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी व बांधकाम क्षेत्रास लागणाऱ्या साहित्यांचे पुरवठादार आदी विविध विषयांच्या ८७ दालनांद्वारे अद्ययावत माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ८ रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूरचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी आमदार दिलीप माने, महापौर अलका राठोड, महापालिकेचे नगर अभियंता सुभाष सावस्कर आदी उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती संस्थेचे अध्यक्ष अजय पाटील व सचिव विनायक जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्थापत्य प्रदर्शनासाठी पन्नास फुटी आकाराचे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले असून, यात स्थापत्य कौशल्य, तंत्रज्ञान व कल्पकता यांचा त्रिवेणी संगम पाहावयास मिळणार आहे. काही बांधकाम उद्योजक तथा व्यावसायिक दृक्श्राव्य यंत्रणांसह प्रात्यक्षिकांद्वारे सविस्तर माहिती देणार आहेत. तसेच सौरऊर्जा वापर, वीज व पाणी बचत, पाणी शुद्धीकरण, जलपुनर्भरण, पर्यावरण संरक्षण आदी विषयांवर मागदर्शन तथा जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे अजय पाटील यांनी सांगितले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष  प्रकाश तोरवी, खजिनदार बाबूराव बिराजदार, प्रदर्शनाचे समन्वयक इफ्तेकार नदाफ, सलीम नाईकवाडी आदी उपस्थित होते.