सँडहर्स्ट रोड स्थानकाला लागून असलेल्या सुरक्षा भिंतीचा काही भाग ढासळल्यानंतर मध्य रेल्वेने या भागात केलेल्या पाहणीत याच पट्टय़ातील ३०० मीटरचा भाग धोकादायक आढळला आहे. या पट्टय़ात संरक्षक भिंतीलगत असलेल्या इमारतींचा पाया, त्यांचा सांगाडा यांची स्थिती काय आहे, याबाबत पालिका आणि म्हाडा यांनी पाहणी करावी, असेही मध्य रेल्वेने सूचित केले आहे. रेल्वेने आपल्या पाहणीचा अहवालही या दोन संस्थांना सादर केला आहे.
सँडहर्स्ट रोड स्थानकाला लागून असलेल्या संरक्षक भिंतीचा काही भाग ढासळून त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला होता. त्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी आग्रही भूमिका घेत पालिकेला या भिंतीलगतच्या धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यास भाग पाडले होते. अशा प्रकारे इमारतीचा अथवा भिंतीचा भाग ढासळून प्रवाशांच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो, हे लक्षात आल्यानंतर ब्रिगेडिअर सूद यांनी या कामासाठी विशेष मेगाब्लॉकही दिला होता.
‘थोरात हाऊस’चे काम झाल्यानंतर मध्य रेल्वेने काही स्थानकांदरम्यान सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वेमार्गाला लागून असलेल्या इमारती, संरक्षक भिंती यांची स्थिती याबाबत हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सर्वप्रथम मस्जिद ते भायखळा या स्थानकांदरम्यान पाहणी करण्यात आली. या पाहणीचा अहवाल मध्य रेल्वेकडे आला आहे. या अहवालानुसार थोरात हाऊसजवळील तब्बल ३०० मीटरचा भाग रेल्वेच्या वाहतुकीसाठी भविष्यात धोकादायक ठरू शकतो, असे लक्षात आले आहे. या भागात तब्बल १०-१२ इमारतींचा समावेश आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांनी दिली.या भागात संरक्षक भिंत उभारण्याआधी या सर्व इमारतींची पाहणी करण्याची विनंती मध्य रेल्वेने म्हाडा आणि महापालिका यांना केली आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या सर्वेक्षणाचा अहवालही पालिकेला सादर केला आहे. आता याबाबत पालिका आणि म्हाडा या दोन्ही संस्था काय भूमिका घेतात याकडे आमचे लक्ष लागले आहे. या इमारतींची पाहणी झाली आणि त्या धोकादायक नसल्याचे संबंधित संस्थांनी आम्हाला कळवल्यानंतर रेल्वे संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू करेल, असेही निगम यांनी स्पष्ट केले.