द्रुतगती महामार्गावर खोपोली – खालापूर येथे मोटारीला भीषण अपघात होऊन महाबळेश्वर येथील चार जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण व्यावसायीक माल खरेदीकरण्यासाठी मोटारीतून मुंबईला गेले होते.
महेश विष्णुपंत बोधले (वय ३५), अनंत ऊर्फ जितू गजानन बोधले (वय ३८), म्हामू अली डांगे (वय ४०) हे व्यापारी व त्यांच्या दुकानाचा नोकर रामचंद्र सीताराम जाधव (वय २७) असे चारजण श्री. बोधले यांच्या मोटारीतून माल खरेदीसाठी मुंबईकडे जात होते. आज सकाळी सातच्या सुमारास द्रृतगती महामार्गावरून जात असताना खालापूरजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटून हा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी जोरदार होती की मोटारीचा चक्काचूर झाला. अपघातात चार पैकी तीनजण जागेवरच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारांसाठी जवळच्या दवाखान्यात नेत असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
मृतातील महेश बोधले हे अत्यंत कुशल इलेक्ट्रिशन होते. त्यांच्यामागे पत्नी, एक छोटा मुलगा व मुलगी आहे. अनंत ऊर्फ जितु ऊर्फ काका बोधले हा महेश बोधले याचा चुलत भाऊ असून त्याचा येथील बाजारपेठेत रेडिमेड पर्स, पिशव्यांचे दुकान आहे. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. म्हामू अली डांगे ऊर्फ म्हामुली हा अविवाहित होता. त्याचेही येथील एस.टी. स्टँडसमोर दुकान आहे. रामचंद्र जाधव हा जितू बोधले यांच्या दुकानात नोकर होता. तो अविवाहित होता. चौघांच्या मृत्यूमुळे महाबळेश्वरमध्ये शोककळा पसरली.