पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा देवस्थानाला एकाच वेळी पाच जिल्हा न्यायाधीशांनी भेट दिली. मध्यान्ह आरती करून त्यांनी दर्शन घेतले व तीर्थक्षेत्र विकास निधीतून चाललेल्या कामांची पाहणी करून देवस्थानच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
कोरठण खंडोबापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कारेगाव येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश डी. एस. शिंदे, एम. व्ही. देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश ए. के. पाटील, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. के. कदम, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश प्र. चि. घुगे या कार्यशाळेला उपस्थित होते. कार्यशाळेचे कामकाज संपल्यानंतर त्यांना देवस्थानला भेट दिली व दर्शन घेतले. देवस्थानचे अध्यक्ष पांडूरंग गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले.
रवी गांधी, संतोष वाळूंज, शांताराम खोसे, बन्सी ढोमे आदी यावेळी उपस्थित होते. न्यायाधीशांनी देवस्थानच्या विकास कामांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. भाविकांसाठी चांगल्या सुविधा देणे महत्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.