चंदगड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी रविवारी सुमारे ६५ टक्के मतदान झाले. तप्त उन्हात मतदारांचा प्रतिसाद थंड असल्याचे दिसून आले. चंदगड तालुक्यातील एकही उमेदवार नसल्याने आणि निवडणुकीचा कालावधी अवघ्या दीड वर्षांचा असल्याने मतदानाची टक्केवारी घटली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज झालेल्या मतदानात राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्डेन्नावर व शिवसेनेचे सुनील शिंत्रे या तिघा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून गुरुवारी (२८ फेब्रुवारी) रोजी होणाऱ्या मतमोजणीतून निकालावर प्रकाशझोत पडणार आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनाने चंदगड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. तिरंगी लढतीमध्ये बाजी मारण्याच्या दृष्टीने उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी महिनाभर जोरदार प्रयत्न केले होते. त्यामुळे मतदान मोठय़ा प्रमाणात होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. प्रत्यक्षात आज मतदानादिवशी मतदारांमध्ये निरुत्साह असल्याचे जाणवले. मतदारसंघात ३४५ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. अपवाद वगळता बहुतेक मतदान केंद्रांत गर्दी कमी होती. दिवसभर रांगा लागल्याचे चित्र एखाद्याच मतदान केंद्रात दिसत होते. एकंदरीत मतदान शांततेत झाल्याचे दिसून आले. दुपारी १ वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले होते. तर सायंकाळी ५ वाजता मतदान थांबले, तेव्हा सुमारे ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्याचे निदर्शनास आले. संध्यादेवी कुपेकर, राजेंद्र गड्डेन्नावर व सुनील शिंत्रे हे तिघे उमेदवार गावागावांतील मतदान केंद्रांना दिवसभर भेट देत होते. मतदान अधिकाधिक व्हावे, यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देत असतानाच दुसरीकडे मतदारांना ते अभिवादन करीत होते. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंदगड तालुक्यात तर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार के.पी.पाटील यांनी गडहिंग्लज तालुक्यातील गावांवर लक्ष केंद्रित केले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दोन्ही तालुक्यांतील अनेक गावांना भेटी दिल्या. स्वाभिमानीचे पदाधिकारी आपआपल्या गावातील केंद्रांवर तळ ठोकून होते.  
निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी विवेक आगवणे, निवडणूक आयोगाचे अधिकारी हे मतदान योग्य होण्यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. तर पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवल्याने किरकोळ अपवादवगळता अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.