गेली अनेक वर्षे कागदावरच असलेल्या महापालिकेच्या सावेडीतील नियोजित नाटय़गृहाला आता कुठे निविदेचे पंख फुटले आहेत. मात्र, हे पंख नगरचेच असून ते मूळ खर्चापेक्षा तब्बल २७ टक्के जादा दराने आलेले आहेत व स्थायी समितीच्या मंजुरीनंतरच त्यात ताकद येईल.
सावेडीतील या नियोजित नाटय़गृहासाठी गेली कित्येक वर्षे नगरमधील रंगकर्मीचे मोर्चे, धरणे, पथनाटय़े असे विविध प्रयोग सुरू आहेत. मात्र, आखाडे गाजवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मनपातील पदाधिकारी काही नाटय़गृहाचे मनावर घेईनात. राज्य सरकारच्या जिल्हा तिथे नाटय़गृह या योजनेत मनपाला २ कोटी मंजूर झाले. त्यातील ६० लाख तर हातातही मिळाले, मात्र अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या याच निष्क्रियतेमुळे ते परतही गेले. मग रंगकर्मीनीच धावाधाव करून ते परत आणले.
दरम्यानच्या काळात या नियोजित नाटय़गृहाचे आरेखन झाले. त्यात सतरा फरक झाले. त्यापेक्षाही जास्त अभिनेते पाहुण्यांनी ते वारंवार तपासले. त्यातील काहींनी मी सगळे काम पाहतो, पण माझ्यासाठी एक गाडी, एक कार्यालय, एक कर्मचारी द्या अशी मागणी केली. ती पूर्ण होणे अर्थातच शक्य नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा नाटय़गृहाची गाडी रखडली. त्यालाही तब्बल २ वर्षे उलटल्यावर एकदाची या कामाची निविदा प्रसिद्ध झाली. त्यात अनुदान २ कोटीचे व प्रत्यक्ष काम मात्र ५ कोटी ९७ लाखांचे असे झाले. उर्वरित रक्कम देण्याची मनपाची कुवत नाही हे लक्षात घेऊन एकही निविदाधारक पुढे आला नाही. असेही सलग ४ वेळा झाले. त्यात वर्ष गेले. अखेर चार वेळा निविदा प्रसिद्ध झाल्यावर फक्त एक निविदा आली तरीही ती स्वीकारावी हा नियम लक्षात घेऊन पाचव्या वेळी एक निविदा आली. ती मनपाने प्रस्तावित केलेल्या खर्चापेक्षा तब्बल २७ टक्के जादा दराची आहे. म्हणजे आधीच मनपाची निविदा जादा खर्चाची व त्यात २७ टक्के जादा म्हणजे ही निविदा आता तब्बल साडेसात कोटी रूपयांची झाली आहे. नगरच्या ए. सी. कोठारी या मनपाची कामे करण्यासाठी म्हणून प्रसिद्ध असलेल्या फर्मने ती जमा केली आहे. ही निविदा स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी जाईल.