राज्य शासनाने सिंचनावर ७१ हजार कोटी रुपये खर्च केले असले तरी ओलिताखाली जमीन येण्याचे प्रमाण अवघा अर्धा टक्के आहे. या कामात सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याने त्यांना सत्तेवरून हटविले पाहिजे. युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट मंत्र्यांना तुरुंगात डांबले जाईल, असा इशारा भाजपचे सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सांगली जिल्हय़ात बुधवारी दिला.    
मिरजेचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्या पाच दिवसांच्या आंदोलनानंतर शासनाने तेथील पाणीप्रश्न सोडविण्याचा व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे मान्य केले होते. या लढय़ाला यश आल्याबद्दल मिरज तालुक्यातील भोसे येथे सायंकाळी विजयी सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी आमदार विनोद तावडे होते. सभेवेळी आमदार प्रकाश शेंडगे, आमदार संभाजी पवार, आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची भाषणे झाली. मुंडे यांच्या हस्ते आमदार खाडे यांचा सत्कार करण्यात आला.    
भ्रष्टाचारी, नाकर्त्यां राज्य शासनाविरुद्ध बंड पुकारून परिवर्तन घडवा, असे आवाहन करून मुंडे म्हणाले, सध्याच्या शासनाइतके निष्क्रिय शासन यापूर्वी कधीही पाहिलेले नाही. कोणताही प्रश्न विचारला की मंत्रालयात जळालेल्या फाईलींकडे बोट दाखविले जाते. हीच उत्तरे मिळणार असतील तर सत्ताधाऱ्यांची लंका जाळून टाकली जाईल.    
पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळाची समस्या आटोक्यात आणण्यास राज्य शासन अपयशी ठरली आहे, असा दावा करून ते म्हणाले, राज्याच्या दुष्काळासाठी भरघोस तरतूद केल्याचे राज्यकर्ते सांगत असले तरी शरद पवार यांच्या म्हाडा मतदारसंघात ४६० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. दुष्काळ निवारणात जिल्हय़ाजिल्हय़ात हा भेदभाव कशासाठी याचा जाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्याचे धाडस होत नाही, असे त्यांच्याच पक्षाचे आमदार सांगत नाहीत. राज्यकर्त्यांकडे इच्छाशक्ती नसल्याने राज्याचा विकास झालेला नाही. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर विकास कसा होऊ शकतो. गुजरातच्या प्रगतीवरून लक्षात येते. या वेळी मुंडे यांनी सांगली जिल्हय़ातील पतंगराव कदम, आर. आर. पाटील, जयंत पाटील या राज्यातील व प्रतीक पाटील या केंद्रातील मंत्र्यांवर टीका केली. इतके सारे मंत्री असूनही सांगली जिल्हा विकासापासून वंचित असल्याची टीका त्यांनी केली.    आमदार तावडे म्हणाले, म्हैसाळ योजनेचे पाणी मिरज तालुक्याला प्रथम प्राधान्याने मिळणे गरजेचे असताना ते तासगावला कसे गेले याचा जाब विचारला पाहिजे. आमदार खाडे यांच्या उपोषणानंतर शासनाला मिरज तालुक्यातील दुष्काळाची जाणीव झाली आहे. आता या शासनाच्या पेकाटात लाथ घालून विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना सत्तेवरून हाकलून लावावे.