राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हाताच्या चिन्हावर तर, काँग्रेसचेच ज्येष्ठ आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे समर्थक नारळ चिन्हावर आमने-सामने उभे ठाकल्याने लक्षवेधी ठरलेल्या मलकापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी आज रविवारी कमालीच्या चुरशीने व चोख बंदोबस्तात सुमारे ७८ टक्के मतदान झाले. तर, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, सत्ताधारी काँग्रेसने सर्व सतराही जागांवर विजयाचा दावा केला आहे. तर, विरोधी यशवंत विकास आघाडीने सत्तांतर अटळ असल्याचा विश्वास व्यक्त करताना, निवडणुकीत काटय़ाची टक्कर दिली आहे. उद्या सोमवारी सकाळी कराडच्या यशवंतराव चव्हाण बचत भवनात मतमोजणी होणार आहे.
मलकापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत १७ जागांसाठी ४२ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत सीलबंद झाले. या निवडणुकीत काँग्रेसचे १७, यशवंत विकास आघाडी (बंडखोर काँग्रेस) १७, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ५ आणि तीन अपक्ष निवडणूक रिंगणात होते. काँँग्रेसने सांगली महापालिकेच्या सत्तेचा फॉम्र्युला म्हणून येथे हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवली. अशातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या होमपीचवरील या निवडणुकीत काँग्रेसचेच ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री विलासकाका उंडाळकरांच्या समर्थकांनी सवतासुबा घेत यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून चुरस निर्माण केली. आणि काँग्रेस विरूध्द बंडखोर काँग्रेस अशीच ही दुरंगी लढत लक्षवेधी ठरली. आज झालेल्या चुरशीच्या मतदानात एकूण ४ प्रभागातील २८ मतदान केंद्रावर ७७.७३ टक्के मतदान झाले. प्रभाग क्रमांक १ मध्ये ४ सदस्य निवडायचे असून, त्यासाठी ७४.५८ टक्के मतदान झाले. या प्रभागात सत्ताधारी आघाडीचे राजेंद्र प्रल्हाद यादव हे स्वत: नशिब आजमावताना उर्वरित तिन्ही उमेदवारांचे नेतृत्व करीत होते. सत्ताधाऱ्यांसाठी हा प्रभाग प्रबळ मानला जाता आहे. रभाग क्रमांक २ मध्येही ४ सदस्य निवडावयाचे असून, त्यासाठी चुरशीने ७८ टक्के मतदान झाले आहे. या प्रभागात यशवंत विकास आघाडीचे उमेदवार काहीसे प्रबळ ठरल्याचे दिसून आले. तर, प्रभाग क्रमांक ४ सदस्य निवडावयाचे असून, त्यासाठी ७८.०३ टक्के मतदान झाले आहे. या प्रभागात सत्ताधारी गटाचे हणमंतराव जाधव तर, विरोधी यशवंत विकास आघाडीचे सुहास कदम हे ताकदीचे उमेदवार आपल्या आघाडीचे नेतृत्व करीत नशीब आजमावत आहेत. या प्रभागात संमिश्र वातावरण असून, अटीतटीची लढत अपेक्षित आहे. तर, प्रभाग क्रमांक ४ मध्ये सर्वाधिक ५ सदस्य निवडावयाचे असून, त्यासाठी उच्चांकी ७९.९६ टक्के मतदान झाले आहे. येथे सत्ताधारी आघाडीचे सर्वेसर्वा मनोहर शिंदे तसेच विरोधी आघाडीच्या नेते अंकुश जगदाळे व शीतल थोरात स्वत: मतपेटीचा कौल घेताना आपल्या पॅनेलचे नेतृत्व करत होते. हा प्रभाग सत्ताधाऱ्यांसाठी हुकमी मानला गेला आहे.
दरम्यान, मतदानकेंद्राबरोबरच ठिक, ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस निरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक व १६८ पोलीस कर्मचाऱ्यांसह जलद कृतिदलाच्या तीन तुकडय़ा तैनात होत्या. प्रांताधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणा मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे.