सोलापूर जिल्ह्य़ात काल गुरूवारी सायंकाळनंतर बेमोसमी पावसासह वादळी वाऱ्यांचा तडाखा बसून प्रचंड नुकसान झाले आहे. वादळामुळे छतावरील पत्रे उडून अंगावर पडून दोघे जण मृत्युमुखी पडले, तर ठिकठिकाणी घडलेल्या घटनेत वीज अंगावर कोसळून तब्बल सहा जणांचा बळी गेला. यात एक महिला व एका बालकाचा समावेश आहे. तर अकरा जण जखमी झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीतही जपलेल्या फळबागांची मोठी हानी झाल्याचे दिसून येते. दरम्यान, या आपत्कालीन स्थितीचा आढावा घेऊन मृतांच्या वारसदारांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची धग वाढून तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सियसच्या पुढे गेला असताना काल गुरूवारी सायंकाळी अचानकपणे वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला प्रारंभ झाला. त्याचवेळी वादळ वाऱ्यांनी हाहाकार माजविला. शहराप्रमाणे ग्रामीण भागात एखाद दुसऱ्या तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वत्र पावसाबरोबर वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला. पडलेल्या पावसाची नोंद २२ मिलीमीटपर्यंत झाली आहे.
शहरातील नवीन तुळजापूर नाका येथे वादळामुळे एका चहा कॅन्टीनवरील पत्रे उडून अंगावर सुरेश शिवराम भोसले (वय ४०,रा. मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) व इसाक मैनोद्दीन शेख (वय ३०, रा.नवीन तुळजापूर नाका) हे दोघे मरण पावले. तर यल्लप्पा सिद्राम कुंभार (वय ४०, रा.सुंदरम् नगर, विजापूर रोड, सोलापूर), लक्ष्मीकांत बाबूराव देवरनादगी (वय ४०, रा. दक्षिण कसबा) व निरंजन राजशेखर वारशेट्टी (वय ४५, रा. भारतमाता सोसायटी, होटगी रोड) हे तिघेजण जखमी झाले. तर नई जिंदगी भागात शोभानगर येथे घरावरील पत्रे उडून अंगावर पडल्याने त्यात नौशाद इस्माईल शेख (वय ५०) हे डोक्याला मार लागून जखमी झाले.
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे सुभाष सिद्राम उकरंडे (वय ४५) हे अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाले, तर अमोगसिध्द संगप्पा कोरे (वय ४०) हे जखमी झाले. याशिवाय हिवरगाव येथे अमोल अरूण पाटील हा नऊ वर्षांचा मुलगा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्युमुखी पडला. तर मोहोळ तालुक्यात कुरूल येथे हेमा सुधाकर साखरे यांच्या शेतात महादेव लिंबाजी बडे (वय ३५) व सखाराम दगडू निहारकर (वय ४२, दोघे रा. कट्टेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) या दोघा ऊसतोड मजुरांचा बळी गेला. याच तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथे वीज अंगावर कोसळून शोभा मुकुंद दुधाळ (वय २२) ही तरूणी जागीच मरण पावली. तर तिची मुलगी प्राजक्ता (वय ३) ही जखमी झाली.दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे शेळ्या राखण्यासाठी गेलेले गणू धर्मा राठोड हे वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत असताना आकस्मिक मरण पावले.
वादळी वाऱ्यांचा तडाखा दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, माढा, सांगोला आदी तालुक्यांना बसला. वीज कोसळून २५ पेक्षा जास्त गाय, बैल, रेडा, शेळ्या अशी जनावरे दगावली. दक्षिण सोलापूर तालक्यात बोरामणीसह होनमुर्गी, बरूर, इंगळगी, टाकळी, कुरघोट, माळकवठे, वांगी आदी गावामध्ये वादळामुळे घरांवरील छपरे उडून गेली. वांगी येथे शिवप्पा काशप्पा बनशेट्टी यांच्या घरावर वीज कोसळली. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.अक्कलकोट परिसरात आळगी, उमरगे, कुरनूर येथेही विजा कोसळल्या. यात जनावरे दगावली. तर सांगोला तालुक्यातील एकतपूर, महीम, वाकी (घेरडी) या गावांना वादळाचा तडाखा बसला.
या वादळांमुळे जिल्ह्य़ात फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच भीषण दुष्काळात शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे फळबागा जपल्या होत्या. परंतु वादळामुळे प्रामुख्याने केळी व आंब्यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. नुकसानीचा अंदाज लगेचच समोर आला नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आपदग्रस्त फळबागांचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच वीज  कोसळून व पत्रे अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची माहिती संकलित केली जात असून मृतांच्या वारसदारांना येत्या दोन-तीन दिवसांत नुकसान भरपाई अदा केली जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांनी सांगितले.
 वीज अटकाव यंत्रणा अर्धवटच
सोलापूर जिल्ह्य़ात यापूर्वी बेमोसमी पाऊस पडून त्यात विजा कोसळल्याने अनेकांचा जीव गमावला आहे. काल गुरुवारी देखील वीज अंगावर कोसळून सहा जण दगावले. या निमित्ताने जिल्ह्य़ातील वीज अटकाव यंत्रणेचा आढावा घेतला असता ही यंत्रणा अतिशय तुंटपुजी व अर्धवट असल्याचे दिसून येते. ही यंत्रणा भक्कम झाल्यास वीज कोसळल्यासारखी नैसर्गिक आपत्ती टळेल, असे बोलले जाते.
सध्या जिल्ह्य़ात गेल्या चार वर्षांपासून केवळ चारच ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित आहेत. यात बार्शी तालुक्यातील मालेगाव व तांबेवाडी अशा दोन ठिकाणी ही यंत्रणा आहे. तर माढा तालुक्यातील ढवळस व मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे वीज अटकाव यंत्रणा उपलब्ध आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी ही यंत्रणा कार्यान्वित केली होती. एके ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यासाठी जेमतेम ५० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. याप्रमाणे जिल्ह्य़ात सर्व  ९३ मंडळ क्षेत्रात वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यासाठी सुरुवातीला २० लाखांची मागणी केली असता त्यापैकी केवळ दोन लाखांचा निधी मिळाला. त्यामुळे या निधीतून फक्त चार ठिकाणीच वीज अटकाव करणे शक्य झाले आहे. उर्वरित भागात ही यंत्रणा बसविण्याची मागणी पुढे येत आहे.