जिल्ह्य़ात सर्वत्र पावसाची टिपटिप सलग दुसऱ्या दिवशी सुरूच आहे. सरासरीच्या ३७१ मिमी पावसाची नोंद झाली असून खरीप पिके डोलू लागली आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे शहरासह सर्वत्र रस्ते ओले होत असले, तरी जिल्हय़ातील दोन मोठे, ११ मध्यम व लघु प्रकल्प अजूनही कोरडेठाक आहेत. खरिपाची पिके पोसतील इतकाच जेमतेम पाऊस पडत असल्याने आष्टी तालुक्यात ८४ टँकर आजही सुरू आहेत. मोठय़ा पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्हय़ात या वर्षी वेळेवर पावसाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनीही खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. जून-जुल महिन्यांत काही दिवस उघडीप देत पावसाची तुरळक हजेरी कायम राहिली. जुलैच्या अखेरीस सलग ३ दिवस पावसाचा जोर राहिला. मात्र, हे प्रमाण हलके असल्यामुळे पाणी कोठेच खळखळले नाही. सततच्या पावसामुळे खरीप पिके मात्र चांगली आहेत. ऑगस्ट सुरू होताच पावसाचे पुन्हा आगमन झाले. मागील दोन दिवसांपासून सर्वदूर पावसाची टिपटिप सुरू असली, तरी पावसाचा जोर मात्र नाही. पावसाळ्याचे दोन महिने लोटूनही मोठय़ा प्रकल्पांतील पाणीसाठय़ांत वाढ झाली नाही. परळी, अंबाजोगाई ही दोन तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांतील प्रकल्प कोरडेठाक आहेत. माजलगाव व मांजरा हे दोन मोठे, तसेच १६ मध्यम प्रकल्पांपकी ११ प्रकल्प कोरडेच आहेत. िबदुसरा प्रकल्पात गाळ काढण्यासाठी यंत्रणांनी पाडलेल्या खड्डय़ांतही पाणी आले नाही. १२२ छोटय़ा तलावांमध्येही अवघा १४ टक्के पाणीसाठा आहे.