दिवंगत प्रख्यात तबलावादक पं. तारानाथराव यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त सोलापुरात उद्या शनिवारी, १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये शास्त्रीय गायक सम्राट पंडित यांच्या  गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. या वेळी स्थानिक कलावंतांच्या सहभागातून फ्युजन सादर करून विख्यात सतारवादक स्व. पं. रविशंकर यांना श्रद्धंजली अर्पण केली जाणार आहे. सम्राट पंडित यांनी पतियाळा घराण्याकडून गायनाचे शिक्षण घेतले आहे. ते पं. जगन्नाथ प्रसाद यांचे चिरंजीव आहेत. ठुमरी हे त्यांच्या गायनाची खासियत आहे. याबाबतची माहिती संयोजक तथा पं. तारानाथराव यांचे शिष्य आनंद बदामीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमातच स्थानिक कलावंतांच्या सहभागाने फ्युजन सादर करून पं. रविशंकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचे बदामीकर यांनी सांगितले. या वेळी ओंकार सूर्यवंशी व संजय बागेवाडीकर हे उपस्थित होते.