अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा निवासाचा प्रश्न ऐरणीवर
इमारत अतिधोकादायक झाल्याने पालिकेने खंडीत केलेला वीज आणि पाणीपुरवठा, विकासकाशी फिस्कटलेल्या वाटाघाटी, आश्रयासाठी उपलब्ध नसलेला पर्याय आदी अनेक कारणांमुळे अंधारात बुडालेल्या धोकादायक इमारतींच्या छपराखाली आजही अनेक रहिवाशी दिवस कंठत आहेत. वीज आणि पाणी तोडताना पर्यायी घराचा विचारच सरकारने न केल्यामुळे तब्बल ७८ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवासांच्या वास्तव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंब्रा येथील इमारत दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले. महापालिकेने धोकादायक इमारतींची यादी तयार करुन अतिधोकादायक इमारतींवर नोटीसा बजावल्या. तब्बल ५१७ अतिधोकादायक इमारतींपैकी १२२ इमारती रिकाम्या करण्यात पालिकेला यश मिळाले. यापैकी काही रहिवाशांना पालिकेने सेवा निवासस्थानांमधील पर्यायी घरे उपलब्ध करून दिली. मात्र सुमार दर्जा असलेल्या या पर्यायी घरात जाण्यासाठी सुरुवातीला पालिका कर्मचाऱ्यांनीही नकार दिला. मात्र नोकरीवर गदा येऊ नये या भीतीपोटी त्यांनी धोकादायक इमारतीमधील घर रिकामे केले आणि आपले संसार पर्यायी घरात हलवले. मात्र ७८ इमारतींमधील रहिवाशांनी घर रिकामे करण्यास नकार दिला. त्यामुळे या इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला. यामध्ये पालिकेच्या २४, राज्य सरकारच्या तीन, तर ५१ खासगी इमारतींचा समावेश आहे. ७८ इमारतींपैकी काही खासगी इमारती पुनर्विकासाच्या उंबरठय़ावर आहेत. मात्र विकासकाबरोबरच्या वाटाघाटी फिस्कटल्यामुळे अनेक रहिवासी अतिधोकादायक इमारतीमध्येच वास्तव्य करीत आहेत.
 रहिवाशांवर नोटीस बजावूनही त्यांनी घर रिकामे न केल्यामुळे पालिकेने या इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे काही रहिवाशांनी आपल्या मुलांच्या घरी, तर काहींनी आपल्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला आहे. मात्र कुठेच आसरा नसल्यामुळे अनेक रहिवासी आजही मोडकळीस आलेल्या इमारतीतच दिवस कंठत आहेत.
अतिधोकादायक बनलेल्या म्हाडाच्या अनेक इमारती अंधारात बुडाल्या असून तेथील पाणीपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यापैकी काही इमारतींचे अभिहस्तांतरण झालेले असून पुनर्विकासातून टॉवर उभा राहण्याचे स्वप्न रहिवाशी पाहात आहेत. मात्र विकासकाबरोबर वाटाघाची सुरू असतानाच इमारती अतिधोकादायक बनल्या आणि पालिकेने नोटीसा बजावून वीज-पाणी तोडले. पालिकेने आपले काम चोख बजावले. पण पुनर्विकासानंतर म्हाडाला नव्या इमारतीत काही सदनिका मिळणार आहेत. मग अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना म्हाडानेच पर्यायी घर द्यावे, अशी मागणी या इमारतींमधील रहिवाशी करीत आहेत.