वडगाव बुद्रुक येथील जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार करूनही विविध यंत्रणांकडे कोणतीही प्रत्यक्ष कारवाई होत नाही. तसेच, अतिक्रमण केलेल्या व्यक्ती व पोलीस आपल्याला धमकावत आहेत, असा आरोप कमलाकर खंडेराव भोसले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
भोसले यांच्या मालकीची वडगाव बुद्रुक येथे सुमारे ३६०० चौरस मीटर जमीन आहे. त्यांच्या शेजारी असलेल्या दोन नगरसेवक आणि एक माजी नगरसेविकेचा मुलगा यांनी त्यांच्या ३०४ चौरस फुट जागेवर अनधिकृत कंपाऊंड वॉल बांधली असल्याचा भोसले यांचा दावा आहे.
त्याबाबत भोसले यांनी पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग, बांधकाम नियंत्रण कार्यालय आणि आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेऊन बांधकाम नियंत्रण कार्यालयाकडून संबंधितांना भिंत पाडण्याची सूचना देण्यात आली होती, पण अद्याप भिंत पाडलेली नाही आणि कोणतीही कारवाईही करण्यात आलेली नाही. अभिरुची पोलीस चौकीत तक्रार नोंदवली असता संबंधित पोलीस अधिकारी तक्रार नोंदवून न घेता उलट सदर प्रकरण तडजोडीने मिटवून टाका, नाही तर खोटय़ा गुन्ह्य़ात अडकवू, अशी धमकी दिल्याचेही भोसले यांनी सांगितले.