शाळा सोडल्याचे दाखले देऊन  प्रवेशास मज्जाव केलेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी रासबिहारी शाळेत घेतले जाईल याची खातरजमा प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच व रासबिहारी स्कूल पालक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शाळा १७ जूनला सुरू होणे आवश्यक आहेत. परंतु रासबिहारी शाळा १३ जूनलाच सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी अनेक पालकांना शाळेत बोलावून त्यांच्याकडून मागील वर्षांची फी घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हातात पाल्याचा शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला. विशेष म्हणजे पालकांनी शाळेकडे दाखल्याची मागणी केलेली नव्हती. आतापर्यंत १५० पेक्षा अधिक मुलांना मागणीशिवाय दाखले देण्यात आले असल्याचे शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे म्हणणे आहे. मागील आठवडय़ात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोगल यांनी दोन इशारावजा नोटीस पाठविल्यानंतरही शाळेकडून मनमानी सुरूच असल्याचा मंचचा आरोप आहे. यासंदर्भात शासन कोणती कारवाई करणार, या पालकांच्या प्रश्नाला शिक्षणाधिकाऱ्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. पालकांनी त्यांना शिक्षण उपसंचालकांशी बोलून तत्काळ उपाय करण्याची मागणी केली.  गुरूवारी पालकांनी उपसंचालकांची भेट घेतल्यावर त्यांना त्वरीत निर्णय घेणे भाग पडले. पालकांनी पाल्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या मूळ प्रती त्याच्या छायाप्रतिंसह शनिवापर्यंत दिनेश बकरे (९४२२७६६२४५) किंवा छाया देव (९४२०७८४६४८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंचने केले आहे.