News Flash

अंगणवाडी सेविकांच्या नियुक्त्यांचा प्रश्न गंभीर

मेळघाटात कुपोषणाचा प्रश्न सातत्याने चर्चेत असताना अंगणवाडी सेविकांच्या नियुक्त्यांकडे देखील दुर्लक्ष करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. चिखलदरा तालुक्यातील बोधू येथे गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडी

| January 17, 2013 03:47 am

*  पात्र उमेदवार असतानाही पद रिक्त का? *  तीन वेळा जाहिराती देऊनही प्रक्रिया रद्द

मेळघाटात कुपोषणाचा प्रश्न सातत्याने चर्चेत असताना अंगणवाडी सेविकांच्या नियुक्त्यांकडे देखील दुर्लक्ष करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. चिखलदरा तालुक्यातील बोधू येथे गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडी सेविकाच नाही, तर चिखलदऱ्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील मरियमपूर येथे तर अंगणवाडीच अस्तित्वात नाही. या गावाला एकात्मिक बालविकास योजनेची सेवाच मिळालेली नाही. इतरही अनेक ठिकाणी अशीच स्थिती असल्याने आदिवासी बालकांच्या आरोग्य आणि शिक्षणाची हेळसांड होत आहे.
मेळघाटातील आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भूमिका महत्वाची मानली जाते. या अंगणवाडी सेविकांवर गावातील मुलांच्या आरोग्याची काळजी आणि त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण पुरवण्याची जबाबदारी असते, पण मेळघाटात अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न जैसे थे असताना अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविकाच नसल्याने संबंधित गावांमध्ये शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. हे प्रश्न तातडीने हाताळण्याऐवजी जिल्हा प्रशासनाने वेळकाढू धोरण अवलंबल्याचा आरोप मेळघाटातील स्वयंसेवी संस्थांनी केला आहे.
अंगणवाडी सेविकांच्या पदभरतीची पहिली सूचना जानेवारी २०१२ मध्ये काढण्यात आली. यासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी होती. यावेळी एकाच उमेदवाराचा अर्ज आल्यामुळे पदभरती रद्द करण्यात आली. त्यानंतर पदभरतीच्या जाहिराती तीन वेळा प्रसिद्ध झाल्या. दरवेळी ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. या एका ठिकाणी पात्रताधारक उमेदवार उपलब्ध असतानाही पद का रिक्त ठेवण्यात येत आहे, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता अंगणवाडी सेविकापदासाठी उमेदवार महिलांची रांग आहे. आता मात्र पदभरतीच्या प्रक्रियेत अनियमितेला वाव असल्याचे किंबहुना त्यासाठी ही प्रक्रिया लांबवण्यात येत असल्याचे ‘खोज’ या संस्थेच्या पूर्णिमा उपाध्याय यांचे म्हणणे आहे.
मरियमपूर हे चिखलदरापासून जवळच असलेले गाव. या गावात अजूनही अंगणवाडी नाही. जवळच एकात्मिक बालविकास विभागाचे कार्यालय आहे. या गावातील बालकांना अंगणवाडीची आवश्यकता आहे, हे अजूनपर्यंत कुणाच्याही लक्षात आलेले नाही. या गावातील मुलांच्या आरोग्यविषयक सेवा आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरवणारी व्यवस्थाच नाही. या गावातील मुलांच्या भवितव्याकडे कुणाचेही लक्ष नाही. प्रशासनाच्या देखील नजरेत ही बाब आलेली नाही, असे पूर्णिमा यांचे म्हणणे आहे.  मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सोडवला गेलेला नाही. मेळघाटातील तीव्र कुपोषित मुलांच्या श्रेणीत सुधारणा झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुळात महिला व बालविकास विभाग, आदिवासी विकास विभाग, आरोग्य विभागाची यंत्रणा गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असताना प्रत्यक्ष गाव पातळीवर काम करणारी व्यक्ती अंगणवाडी सेविका आहे. या सेविकेवर कुपोषित बालकांचे वजन घेणे, वेगवेगळ्या नोंदी ठेवणे, मदतनीसाच्या सहाय्याने पूरक आहार वितरित करणे, अशी जबाबदारी आहे. गावात अंगणवाडी सेविका हजर नसल्यास अनेक प्रश्न निर्माण होतात, मात्र काही गावांमध्ये अंगणवाडी सेविकेची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. मदतनीसावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याने ही यंत्रणा अपंग ठरली आहे.  मेळघाटातील अंगणवाडी सेविकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत आणि तातडीने रिक्त पदांवर त्यांच्या नियुक्त्या केल्या जाव्यात, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने पाठवूनही त्याची दखल घेतली जात नाही, असेही या संघटनांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 3:47 am

Web Title: aganwadi sevika appointments question is compliucated
Next Stories
1 गोंदियानंतर आता राज्यातीलही शाळांमध्ये पोहोचणार ‘गावची शाळा, आमची शाळा’
2 राजीव गांधी विचार मोर्चातर्फे‘नासुप्र’ कार्यालयासमोर ठिय्या
3 आधार कार्डसाठी नागरिकांची गर्दी
Just Now!
X