दिंडोरी तालुक्यातील वणी (खुर्द) येथील वारकऱ्यांविरुद्ध अनुसूचित जाती अत्याचारप्रतिबंधक कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाईविरोधात बुधवारी वारकरी महामंडळाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
सात मे रोजी वणी (खुर्द) येथील अखंड हरिनाम सप्ताहप्रसंगी वारकरी महिलेने एकनाथी भारूड म्हटले. भारूड ही वारकरी संप्रदायाची परंपरा असताना तिचा विपर्यास करून समाजकंटकांनी उपस्थित वारकऱ्यांना धक्काबुक्की व दमदाटी केली. समाजकंटकांनी वाद मिटविण्याऐवजी वादावादी करून दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने कोणतीही चौकशी न करता थेट तीन महिलांसह १३ जणांविरुद्ध अनुसूचित जाती अत्याचारप्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली. या प्रकारामुळे वारकरी संतप्त झाले असून कायद्याचा गैरवापर आणि पोलिसांचा निष्काळजीपणा यामुळे वारकरी दुखावले गेल्याचे महामंडळाने म्हटले आहे. अनुसूचित जाती अत्याचारप्रतिबंधक कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांना पाठबळ देणाऱ्या उपनिरीक्षकांची चौकशी करावी, वारकरी संप्रदायाला नाहक बदनाम करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी वारकऱ्यांनी धरणे आंदोलनाद्वारे केली आहे.