येथील मराठी विश्वकोश आणि शासकीय मुद्रणालयाच्या नव्या इमारतीचे पाच वर्षे रखडलेले काम मार्गी लावण्याच्या कामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला असून यासाठी संयुक्त इमारतीच्या आराखडय़ाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. सदर काम लवकर व्हावे यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता.
मायबोली मराठीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, मराठी शब्दांची माहिती जतन करणे, अशा भाषासंवर्धनाच्या प्रयत्नांत वाईच्या मराठी विश्वकोश मंडळाचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याला चालना देण्यासाठी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकालात वाई येथे मराठी विश्वकोश मंडळ स्थापन झाले. मंडळाच्या उभारणीत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा महत्त्वाचा वाटा होता. मंडळातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या २३ पैकी २ ते ११ खंडांच्या छपाईचे काम पाच दशकापासून वाईच्या शासकीय मुद्रणालयात सुरू आहे. अतिशय सुबक छपाईचे काम करणाऱ्या शासकीय मुद्रणालयास विश्वकोशाच्या ६, ८ आणि १० खंडाच्या छपाईसाठी राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले आहेत. परंतु छपाईची जुनी यंत्रणा व इमारतीची दुरवस्था यामुळे विश्वकोश खंडांच्या निर्मितीच्या कामात अडचणी येत होत्या. मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती विजया वाड यांनी नुकतीच आमदार पाटील यांची भेट घेऊन कार्यालयाच्या नियोजित इमारतीचे काम मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आमदार पाटील यांच्या आग्रहामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच विश्वकोशच्या नियोजित इमारतीच्या प्रस्तावाबाबत मंत्रालयात बैठक घेतली. त्यामुळे आता यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षांत या मंडळाच्या इमारतीचे काम वेग घेण्याची चिन्हे आहेत. शासकीय मुद्रणालयाच्या नव्याने बांधण्यात येणाऱ्या एकमजली इमारतीच्या तळमजल्यावर शासकीय मुद्रणालय असेल तर पहिला मजला संपूर्णपणे विश्वकोश मंडळासाठी राहिल. या इमारतीचे काम मराठी भाषा विकास विभाग आणि उद्योग खात्यातर्फे होणार आहे.
वाईच्या शासकीय मुद्रणालय व विश्वकोश इमारतीच्या या प्रस्तावाला २००७ साली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. गतवर्षी मराठी विकास विभागाने त्यासाठी केलेली ५० लाखांची तरतूद केली होती. मात्र काम सुरू न झाल्याने निधी परत गेला होता. त्यामुळे विश्वकोश मंडळाच्या इमारतीचे काम प्राधान्याने मार्गी लावावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या.