सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात दलित नेतृत्व हळुहळू का असेना विकसित होत गेले. समाजाने कधी ते नेतृत्व स्वीकारले तर कधी त्याची कुचेष्टाही केली. मात्र, आर्थिक अथवा व्यावसायिक क्षेत्रात  नेतृत्वाची तशी पोकळी जाणवत असे. ती भरून काढणारे नाव म्हणजे पद्मश्री मिलिंद कांबळे. अहमदपूर तालुक्यातील चोबळी या मूळ गावचे मििलद कांबळे यांनी व्यावसायिक प्रगती तर केलीच, पण दलित समाजात विश्वासही निर्माण केला की, ‘आपणही नोकऱ्या देऊ शकतो.’ त्यांनी देश पातळी उभारलेल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या चेंबर्सला आता देशाची उद्योग धोरणे ठरवितानाही विचारात घेतले जाते. मराठवाडय़ाच्या वैचारिक चळवळीतून घडलो. पण केवळ संघर्षांने सारे मिळविण्याऐवजी समन्वयाने पुढे जाता येते हे सांगणाऱ्या कांबळे यांचा उद्या त्यांच्या मूळ गावी सत्कार होत आहे.
मराठवाडय़ातल्या खेडय़ात जसे शिक्षणाचे वातावरण असते, तसे मिलद कांबळे यांना मिळाले. वडील शिक्षक असल्याने शासकीय तंत्रनिकेतनमध्ये १९८७मध्ये त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या काळी सहजपणे नोकरी लागली असती. पण नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करायचा, असा निर्धार करून त्यांनी पुणे गाठले. काही वष्रे अनुभवासाठी नोकरी केली. त्यांनतर व्यवसाय सुरू केला. मूळ विचार मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासातून पुढे आलेला. कारण बाबासाहेब अर्थतज्ज्ञ होते. दलित समाजाची उन्नती करायची असेल तर त्यांचे दारिद्रय़ दूर व्हायला हवे. हाच विचारांचा धागा पकडून मिलिंद कांबळे यांनी व्यवसाय उभारला. भोवताल बदलू शकतील, असे या समाजातील मित्र एकत्रित केले. तत्पूर्वी सामाजिक समरता रथाच्या माध्यमातून राज्य पिंजून काढल्याने सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीचे कांबळे यांचे भान नक्की आलेले होते. त्यामुळे नक्की दिशा कोणती असावी, हे त्यांनी ठरविलेलेच होते. दलित चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजची स्थापना याच विचारातून झाली. २००३ ते २०१३ या जगाच्या वेगवान प्रवासात दलित माणसाने कसे वागावे, याचे वर्णन कांबळे अतिशय मार्मिकपणे करतात. केवळ संघर्ष करून मिळविता येतेच पण समन्वयाने बरेच काही साध्य होते. व्यावसायिकांच्या जगात तर दलित समाजाला मोच्रे, आंदोलने या पलिकडे ग्राहय़ धरले जात नाही. विचारांनी पुढे असूनही मग विकास साध्य होत नाही. त्यामुळे समन्वयाने अधिक चांगले काम करायला हवे. आता जागतिकीकरणामुळे संदर्भ बदलले आहेत. त्याचा नव्याने अभ्यास दलित समाजाने करण्याची गरज असल्याचे कांबळे आवर्जून सांगतात.  देशभरात या विचारांनी काम करणाऱ्या उद्योजकांचे संघटन उभे करणाऱ्या कांबळे यांनी ‘डीक्की’ ही उद्योग संघटना उघडली. आíथक विचाराने पुढे जाणाऱ्या दलित समाजाचे नेतृत्व म्हणून आता कांबळे यांच्याकडे पाहिले जाते. चोबळी या गावात शिकणाऱ्या शिक्षकाच्या मुलाला पद्मश्री मिळाल्याने चोबळीमधील गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार आयोजित केला आहे. आíथक क्षेत्रात दलित समाजाचे नेतृत्वाने करणाऱ्या कांबळे यांचा कौतूक सोहळा मराठवाडय़ाचा मान वाढविणारा आहे.