मुंबईकरांना मुबलक, स्वच्छ आणि समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून लवकरच याबाबतचे धोरण निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी जलवितरण जाळ्याचे मॅपिंग करण्यात येणार आहे. या संदर्भातील निविदा डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात काढण्यात येणार आहे.
मुंबकरांच्या पाणीपुरवठय़ात असमानता असून काही ठिकाणी नागरिकांना आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी मिळते तर पाणीपुरवठा होत आहे, तर काही विभागांत पाण्यासाठी वणवण करावी लागते. सध्या मुंबईकरांना रोज ३३४० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र मुंबईची खरी गरज ४५०० दशलक्ष लिटर पाण्याची आहे. दिवसेंदिवस पाण्याच्या मागणी वाढत असली तरी ती पूर्ण करणे पालिकेला सध्या तरी शक्य नाही. त्याच वेळी पाणी गळती आणि चोरीमुळे ३० टक्के पाणी वाया जाते. त्यावर उपाययोजना म्हणून जीर्ण जलवाहिन्या बदलण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
आता मुंबईमधील जलवितरण जाळ्याचे मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जीएसआय यंत्रणेवर ते उपलबध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाण्याचे ऑडिट, पाण्याचा दाब आणि जलप्रवाहाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जल आराखडा तयार करण्यात येणार आहे. मुलुंडमध्ये रोज २४ तास पाणीपुरवठा करण्यापूर्वी अशाच प्रकारे जल आराखडा तयार करण्यात आला होता. ही सर्व कामे प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहेत. दरम्यानच्या काळात शहर विभागातील जलवितरण व्यवस्थेबाबत अभ्यास करण्यासाठी पालिकेच्या जल विभागातील निवृत्त अधिकारी आणि काही संस्थांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जलवितरण जाळ्याच्या मॅपिंगसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात निविदा मागविण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या कामाला तात्काळ सुरुवात होईल. मात्र हे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी शहर आणि उपनगरांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे काम एक ते दीड वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी व्यक्त केला. जल वितरणाचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी आणि मुंबईकरांना समान पाणीवाटप व्हावे याकरिता विभाग कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.