पुरोगामी चळवळीतील नेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळे चळवळीवर मोठा आघात झाला असला तरी ही चळवळ व त्यांच्या विचारांचा वारसा जोमाने पुढे सुरूच ठेवण्याचा निर्धार नगरमधील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. दाभोलकर यांनी चळवळीच्या माध्यमातून नगर जिल्ह्य़ातीलही अनेक अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा दिला, या लढय़ाच्या आठवणींना उजाळा देताना प्रस्तावित जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचा निर्धारही व्यक्त केला.
सकाळी ही धक्कादायक घटना समजताच कार्यकर्ते सुन्न झाले. ‘अंनिस’चे शहराध्यक्ष डॉ. प्रकाश गरुड यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली. समितीचे नागेश कुसळे, रवींद्र सातपुते, प्रमोद भारुके, विनायक सापा, डॉ. विक्रम म्हस्के, पद्मजा गरुड, संजय जोशी, अर्जुन हराळे, खो-खोचे मार्गदर्शक निर्मल थोरात आदी उपस्थित होते. दाभोलकरांच्या अंत्यविधीसाठी जिल्ह्य़ातील अनेक कार्यकर्ते साता-यास रवाना झाले आहेत.
सायंकाळी वाडिया पार्कमधील म. गांधी पुतळ्याजवळ शहरातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निषेधसभा घेतली तसेच निदर्शनेही केली. शहरातून निषेध मोर्चाही काढण्यात आला. या वेळी ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर म्हणाले, दाभोलकर यांची हत्या म्हणजे हे राज्य अराजकतेकडे चालले आहे, असेच समजावे लागेल. आता तरी सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करून त्यांना श्रद्धांजली वाहावी. या वेळी महेबूब सय्यद, अशोक सब्बन, डॉ. गिरीश कुलकर्णी, शंकरराव घुले, सुभाष कडलग, विवेक पवार, कारभारी गवळी आदींची भाषणे झाली.
जि. प. व अंनिसचे माजी अध्यक्ष अरुण कडू
ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूणच पुरोगामी चळवळीला धक्का बसला आहे व गालबोटही लागले आहे. जादूटोणाविरोधी विधेयक मंजुरीत डॉक्टरांना अपयश आले असले तरी त्याच्या मंजुरीसाठी कार्यकर्त्यांना अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत.
समितीच्या जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. रंजना गवांदे
ही हत्या म्हणजे समाजात अजूनही नथुराम जिवंत आहेत, या नथुरामांना नष्ट करण्याची जबाबदारी आता सर्वसामान्यांवरच आहे. प्रतिगामी शक्तींनी यापूर्वीही त्यांच्यावर भ्याड हल्ले केले होते, पुन्हा त्याच जोमाने काम करून आम्ही उत्तर देऊ.
कॉ. बाबा अरगडे
 दाभोलकर हे व्यक्ती नव्हेतर विचार होता, अशा हल्ल्याने तो नष्ट होणार नाही, महाराष्ट्राच्या इतिहासातील हा काळाकुट्ट दिवस आहे. दाभोलकरांचे कार्य केवळ अंनिसापुरते मर्यादित नव्हते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचारक, संपादक, बुवाबाजी व कर्मकांडाचा विरोधक, सत्यशोधक असे बहुआयामी व्यक्तमत्व होते.
कॉ. रमेश नागवडे
अत्यंत वाईट घटना. अविचारी लोक विचारांची लढाई लढू शकत नाहीत, महात्मा गांधींबद्दलही असेच घडले.
माजी आमदार दादा कळमकर
 समाजवादी आधुनिक विचारांचे पाईक असलेल्या समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न करणा-या कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या निषेधार्ह आहे.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते निर्मलचंद्र थोरात
 उत्तम खेळाडू असलेले दाभोलकर चळवळीतून वेळ काढून नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत.
माजी आमदार भानुदास मुरकुटे
डॉ. दाभोलकरांवरील हल्ला हा निषेधार्थ आहे. अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम पुढे नेणे हीच त्यांना श्रध्दांजली ठरेल. त्यांचा लढा व्यक्तीविरुद्ध नव्हता तो समाजविघातक प्रवृत्ती विरुद्ध होता.

बाळासाहेब विखे
 अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसह राज्याची मोठी हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी व्यक्त केली. काही समाजकंटकांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या केली असली, तरी या चळवळीचा आवाज मात्र दाबला जाणार नाही.
नगर आणि डॉ. दाभोलकर
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सत्यशोधकी विवाहाची नगर जिल्ह्य़ातील सुरुवात १९९३ मध्ये नेवासे येथे केली, त्यास दिवंगत अभिनेते निळू फुलेही उपस्थित होते. सत्यशोधक समाजाचे अधिवेशन १८ वर्षांपूर्वी सोनई येथे आयोजित करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांची ‘चला शिंगणापूरला चोरी करायला ही चळवळही सुरू झाली. त्यामुळे काही हिंदुत्ववाद्यांनी हे अधिवेशन उधळून लावण्याचे प्रयत्न सुरू केले, अखेर हे अधिवेशन तरवडी येथे घेण्यात आले. त्यानंतर आयोजित केलेली महिला परिषदही उधळून लावण्याचे प्रयत्न झाले. दहा वर्षांपूर्वी स्त्री-पुरुष समानतेसाठी शनिशिंगणापूरला महिलांना चौथ-यावर प्रवेश मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. त्यालाही हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला होता.