कोल्हापूर शहरात झालेल्या टीडीआर घोटाळय़ावरून सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. साळुंखेनगरातील २ एकर जागेवरून महापालिकेची दिशाभूल करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अद्याप कारवाई केली का जात नाही, असा मुद्दा या वेळी उपस्थित करण्यात आला. दिशाभूल केल्याने महापालिकेला साडेसात कोटींचा भरुदड बसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या सभेत पाणीपुरवठा,अतिक्रमण निर्मूलन, पार्किंग, कचरा उठाव या मुद्यांवरही जोरदार चर्चा झाली.
महापौर जयश्री सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेत टीडीआर घोटाळय़ाच्या विषयावरून वादंग माजले. टीडीआर घोटाळय़ाची मांडणी करताना भूपाल शेटे म्हणाले, साळुंखेनगर येथील धैर्यशील पाटील यांच्या जागेवर न जाताच नगररचना विभागाचे अधिकारी नेत्रदीप सरनोबत यांनी दोन एकरची जागा पाच एकर दाखवून त्याचे एस्टिमेट केले. त्यामध्ये साडेसात कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. जागेची फेरमोजणी झाली, तेव्हा महापालिकेचे अधिकारी एम. एम. राठोड अनुपस्थित राहिल्याने भूमी अधीक्षक सुवर्णा पाटील यांनी त्यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता, असेही शेटे यांनी निदर्शनास आणून दिले होते.
आरोपाचा खुलासा करताना राठोड यांनी या जागेची सुधारित मोजणी अजूनही झाली नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, या जागेबाबत बीआरसी दिलेला नाही. याबाबत मी तहसीलदारांना पत्र पाठविले आहे. जागेची पाहणी केली याचा अर्थ मोजणी झाली असे नव्हे. पैसे भरून घेतल्याने या व्यवहाराला आव्हान देण्याचा हक्क माझ्या अधिकारात येत नाही. ही चूक भूमिअभिलेख व महसूल विभागाच्या अहवालामुळे झाली आहे. राज्याच्या नगररचना विभागाकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
    राठोड यांच्या खुलाशाने शेटे यांचा पारा चढला. शेटे यांनी राठोड यांना धारेवर धरले. महापालिकेच्या जागेवरील व्यवहाराला आव्हान करू शकत नसाल तर अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसता कशाला, असा प्रश्न उपस्थित करीत चुकीची उत्तरे देऊन सभागृहाची दिशाभूल करू नका, दोषींना बेडय़ा पडत नाहीत तोपर्यंत टीडीआर घोटाळय़ाचा राडा सुरू राहील, अशा शब्दांत शेटे यांनी त्यांना सुनावले.     
महापालिकेचे प्रशासन कोणत्या दिशेने जात आहे, याची चुणूक दिसल्यानंतर आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी प्रशासनाच्या नजरेत गंभीर चूक आणून दिल्याबद्दल शेटे यांचे अभिनंदन करतानाच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. महापालिकेचे नुकसान होणार नाही या सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, असा विश्वास देत त्यांनी सुमारे दीड तास चाललेल्या टीडीआर घोटाळय़ाच्या गोंधळावर पडदा टाकला. आजच्या सभेत टीडीआर घोटाळा या विषयावर महत्त्वपूर्ण व सर्वाधिक वेळ चर्चा झाली.    
रेखा आवळे यांनी कचरा उठावातील समस्यांकडे लक्ष वेधत कंटेनरची मागणी केली, तर अर्पणा अडके यांना अपॅक्स हॉस्पिटलसमोर असणाऱ्या जागेत रुग्णवाहिकेच्या पार्किंगमुळे रहदारीला होणाऱ्या अडचणीबाबत वाचा फोडली. प्रकाश पाटील यांनी या हॉस्पिटल व पार्किंगची व्यवस्था तपासून घेण्याची सूचना प्रशासनाला केली. टाऊन हॉल परिसरातील अतिक्रमण, दुरवस्थेतील राज कपूर यांचा पुतळा या विषयाला हात घालत नगरसेवकांनी पुन्हा एकदा प्रशासनाला धारेवर धरले.     
    शहरातील पार्किंगची समस्या निकालात लावण्याचे आश्वासन देऊन आयुक्त बिदरी यांनी अयोध्या चित्रमंदिर, हुतात्मा पार्क, राजारामपुरी, व्हिक्टर पॅलेस, पांजरपोळ, स्टर्लिग टॉवर आदी तेरा ठिकाणी एकाच वेळी निविदा भरून के.एम.टी. व खासगी बसेसना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. शाहू मार्केट, कपीलतीर्थ मार्केट, ताराराणी मार्केट, पाटणकर हायस्कूल या जागा बांधा, वापरा व हस्तांतर तत्त्वावर पार्किंगसाठी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या सर्व समस्यांसह विचार होऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन सभाध्यक्ष महापौर जयश्री सोनवणे यांनी दिले.