राज्याला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत असल्याने पाणी बचतीसाठी हरतऱ्हेचे प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेकडून होत असतांना काही दिवसांपासून गोदावरी खळाळून वाहू लागल्याने नाशिककरांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकलहरे औष्णिक वीज केंद्रासाठी गंगापूर धरणातून सात जानेवारीपासून पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. यापुढे अजून १० दिवस हे आवर्तन सुरू राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांनी दिली.
जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात गंगापूर धरणातून आर्वतन सुरू झाले. १२ दिवसांचा कालावधी उलटूनही धरणातून पाण्याचे आर्वतन सुरू असल्याने नाशिककरांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. याविषयी धरणातील पाण्याची नोंद ठेवणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कक्षाकडून सात जानेवारीपासून गंगापूर धरणातून पाण्याचे आवर्तन दिवसाला १५० क्युसेस या प्रमाणे सोडण्यात येत असल्याची माहिती दिली. बुधवारी १०० क्युसेस पाणी सोडण्यात आले असून हे पाणी कार्यकारी अभियंत्याच्या आदेशानुसार सोडण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता गंगापूर धरणातून एकलहरे औष्णिक वीज केंद्राच्या गेट दुरूस्तीसाठी पाणी सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पावसाळ्यातच गेट दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. मात्र काही कारणास्तव हे काम होऊ शकले नाही. आगामी पावसाळा डोळ्यासमोर ठेवून गेट दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी आवर्तन देण्यात येत असून मध्यंतरी हे पाणी काही तांत्रिक कारणासाठी बंद करण्यात आले होते. मात्र सध्या आवर्तन नियमित सुरू असून यापुढील १० दिवस धरणातून आवर्तन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे एकलहराच्या मंजूर कोटय़ातील असल्याने याविषयी काही अडचण निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले.