अंबरनाथ शहरात मोकळ्या भूखंडावर माजलेल्या दलदलीत सध्या डुकरांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरमधील डुक्कर व्यावसायिक अंबरनाथमध्ये डुक्कर सोडून त्यांची पैदास करतात. या अनधिकृत पैदासीबाबत कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासनही हतबल आहे.
अंबरनाथ शहरात बरेच भूखंड मोकळे आणि ओसाड आहेत. तिथे सध्या बरीच दलदल माजली आहे. या दलदलीचा फायदा घेऊन त्यात डुक्कर सोडले जातात. त्यात उल्हासनगरमधील व्यावसायिकांचा अधिक भरणा असल्याचे बोलले जाते. या डुकरांना पकडण्यासाठी पालिकेकडे कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. एका पालिका अधिकाऱ्याने खासगी टेम्पोतून डुकरांची ही ब्याद शहराबाहेर घालविण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र त्यात त्याचे दुर्दैव आड आले. रात्री प्रवास करणारा हा टेम्पो एका चौकात वाहतूक पोलिसांनी अडवला व कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला. अखेर त्या अधिकाऱ्याने पदरमोड करून तडजोडीने ही आफत टाळली. मात्र त्यातून शहरात वाढणाऱ्या डुकरांचे करायचे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.