अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शेकडो अपंगांसह सोमवारी पुणे जिल्ह्य़ातील देहू येथून मुंबईकडे कूच केले असून विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘वर्षां’ या निवासस्थानी घेराव घालण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, मागण्यांसदर्भात दोन दिवसात निर्णय घेऊ, असे आश्वासन बच्चू कडू यांना देण्यात आले, पण त्यांनी निर्णय आताच हवा, असे सांगत आंदोलनाचा निर्धार कायम ठेवला. मार्गावर कोणत्याही क्षणी ‘रास्ता रोको’ केले जाईल, असा इशाराही त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.
राज्यातील अपंगांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी देहू येथून ‘अपंग क्रांती आंदोलन’ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची ‘अपंग क्रांती पालखी यात्रा’ सोमवारपासून सुरू झाली. यात शेकडो अपंग सहभागी झाले आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी सरकारसमोर अपंगांशी संबंधित २० मागण्या मांडल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्य़ात अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह आणि अपंग भवन, अपंग कलाकारांसाठी कला अकादमी, मोठय़ा रुग्णालयांमध्ये या वर्गासाठी निवासी सुश्रृषागृह, अपंगांसाठी निवासी आश्रम, त्यांच्या विवाह, शिक्षण आणि इतर गरजांसाठी विशेष अनुदान, सरकारी नोकरभरती मोहीम, अशा या प्रमुख मागण्या आहेत. अपंगांच्या कल्याणासाठी राज्य सरकारने विशेष धोरण आखावे, अशीही त्यांची मागणी आहे.
मागण्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी द्यावा, असे बच्चू कडू यांना प्रशासनातर्फे सांगण्यात आले, पण ते आंदोलनावर अडून बसले आहेत. मागण्यांसंदर्भात वेळकाढूपणा आता खूप झाला, ताबडतोब निर्णय हवा, असे त्यांचे म्हणणे आहे. अपंगांची ही पालखी यात्रा मुंबई येथे पोहोचणार असून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घातणार आहे.ा जाईल. त्याआधी मध्ये ‘रास्ता रोको’ आंदोलनही करू, असे बच्चू कडू यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अमरावती जिल्ह्य़ातून प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने पुण्याला रवाना झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून प्रहार संघटनेने या आंदोलनाची तयारी केली होती. राज्यातील जास्तीत जास्त अपंगांना या आंदोलनात सहभागी होता यावे, यासाठी मोबाईल व एसएमएसच्या माध्यमातून संपर्क यंत्रणा राबवण्यात आली. बच्चू कडू यांनी यापूर्वी आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या गावी ‘डेरा आंदोलन’ केले होते. वैविध्यपूर्ण आंदोलनांच्या प्रकारांमुळे बच्चू कडू अनेकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी अपंगांचे प्रश्न हाती घेऊन संत तुकाराम महाराजांच्या कर्मभूमी देहूतून आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही प्रहार कार्यकर्त्यांनी दिला आहे.