प्राथमिक शिक्षक व शाळांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीतर्फे सोमवारी (दि. १८) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे ३० विद्यार्थी पटसंख्येस एक शिक्षक, प्रत्येक शाळेत स्वतंत्र मुख्याध्यापक, लिपिक व सेवक मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनात मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, राजेंद्र वाणी, मीरा गोसावी आदी सहभागी होणार आहेत. सरकारकडे वेगवेगळ्या ९ मागण्या करण्यात आल्या असून, त्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. यात अधिकाधिक शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण सेवक समितीचे मराठवाडा अध्यक्ष संतोष पाटील डोणगावकर यांनी केले.
शिक्षक समितीचा रविवारी मेळावा
शिक्षण हक्क कायद्यातील त्रुटी व शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने रविवारी (दि. १७) जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. टीव्ही सेंटर येथील कीर्ती मंगल कार्यालयात राज्याचे अध्यक्ष नाना जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची बैठक होईल. या नंतर होणाऱ्या मेळाव्यास शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा व खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित राहणार आहेत. या वेळी आदर्श काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरवही केला जाणार आहे.