तहानलेल्या मनमाडकरांना पालखेड धरणाचे पाणी त्वरीत द्यावे या मागणीसाटी बुधवारी मनमाड बचाओ संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्यात आला. सकाळी जयश्री टॉकीजसमोर मालेगाव-शिर्डी महामार्गावर भर उन्हात ठाण मांडून ‘पाणी द्या’ च्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलक जागेवरून उठण्यास तयार नसल्याचे पाहून अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.
पाणी मिळावे म्हणून शहरात दररोज आंदोलनांची मालिका सुरू आहे. विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या मनमाड बचाओ समितीतर्फे सोमवारी पालिकेला घेराव घालण्यात आला होता. त्या आंदोलनाचीही प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात न आल्याने बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी एकात्मता चौकात एकत्र येऊन घोषणाबाजीसह निदर्शने केली. मोर्चाने सर्व जण मालेगाव-शिर्डी महामार्गावर गेले. सर्वानी रस्त्यावर ठाण मांडले. या वेळी रस्त्याच्या दुतर्फा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यकर्ते तिरंगा ध्वज फडकवित ‘पाणी द्या’ अशा घोषणा लिहिलेल्या गांधी टोप्या घालून घोषणा देत होते.
मोठय़ा प्रमाणात उन्हाचे चटके बसत असतानाही आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आंदोलनामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाल्याने पोलीस उपअधीक्षक समाधान पवार, तहसीलदार सुदाम महाजन यांसह इतर अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढली. परंतु आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात घेत अखेर बळाचा वापर करीत सर्व आंदोलकांविरूध्द प्रतिबंधाक्मतक कारवाई करून ताब्यात घेत त्यांना व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले. परंतु आंदोलक व्हॅनमध्ये न बसता शांततेच्या मार्गाने पोलीस ठाण्यापर्यंत पायी गेले.