पारनेर कारखाना विकत घेण्याची कोणी हिंमत करू नये असा सज्जड इशारा देत कारखान्याचे सभासद व कामगारांनी आज दुपारी चार तास देवीभोयरे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर सर्व आंदोलकांनी अटक करून घेत कारखाना विक्रीचा निषेध केला. आता येत्या दि. १ जुलै रोजी राज्य सहकारी बँकेच्या पुणे येथील कार्यालयावर कुटुंबीयांसह मोर्चा नेऊन ठोस निर्णयाशिवाय माघार घेण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले.
पारनेर कारखान्यावरील कर्ज आवाक्यात आल्याने कारखान्याची विक्री न करता दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टय़ावर चालवण्यास देण्याची मागणी सभासद तसेच कामगारांनी केली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा या प्रस्तावास पाठिंबा असताना भाडेपट्टय़ाची निविदा प्रसिद्घ करण्याऐवजी राज्य सहकारी बँकेने कारखाना विक्रीचा निर्णय घेतला. त्यानंतर कारखान्याचे मूल्यमापन करण्यासाठी आलेल्या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सभासद तसेच कामगारांनी कारखाना कार्यस्थळावरून पिटाळून लावले. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रस्ता रोको तसेच जेलभरो आंदोलन करण्यात आले.
कामगार नेते शिवाजी औटी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दीड हजार सभासद तसेच कामगार कुटुंबीयांसह या आंदोलनात सहभागी झाले होते. कारखान्याची विक्री न करता दीर्घ मुदतीच्या भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या भेटी घेतल्याचे सांगून शिवाजी औटी यांनी या वेळी बोलताना कारखान्याची ५०० एकर जमीन घशात घालण्यासाठी हा आटापिटा सुरू असल्याचा आरोप केला. १५ कोटींसाठी ५०० एकर जमीन व कारखाना विकायचा का, असा सवालही त्यांनी केला.
चार तासांच्या आंदोलनानंतरही आंदोलक अटकेच्या मागणीवर ठाम राहिल्याने पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर यांनी सुमारे एक हजार आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस तसेच खासगी वाहनांमधून त्यांना पारनेर येथे आणण्यात आले. तासभरानंतर सर्व आंदोलकांना सोडून देण्यात आले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे, जिल्हा परिषदेचे सदस्य विश्वनाथ कोरडे, निघोजचे सरपंच संदीप वराळ, बबनराव गंधाक्ते, भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव मोरे, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक अरुण ठाणगे आदींसह सभासद व कामगार कुटुंबीयांसह आंदोलनात सहभागी झाले होते.