टोल आकारणीवरून शुक्रवारी टोलविरोधी कृती समितीचे पदाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्यात वादावादी झाली. टोल आकारणी करतांना आयआरबीचे कर्मचारी वाहनधारकांना दमदाटी करीत असल्याची तक्रार कृती समितीचे सदस्य करीत असतांना त्यांना पोलिसांनी हटकले. शिवाय कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्यासह कार्यकर्त्यांना जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करून सायंकाळी सुटका केली. दरम्यान, शिवसेनेने टोलविरोधात आज खर्डा-भाकरी आंदोलन केले.    
आयआरबी कंपनीने १७ ऑक्टोबरपासून शहरातील टोल वसुलीस सुरूवात केली आहे. त्याविरोधात टोल विरोधी कृती समितीने आंदोलन केले. वाहनधारकांकडून टोल सक्तीने वसूल करू नये, अशी मागणी कृती समितीने कायम ठेवली. दररोज कृती समितीचे कार्यकर्ते टोल नाक्यांवर जाऊन वाहनधारकांना टोल न भरण्याचे आवाहन करीत आहेत. शाहू टोल नाका येथे शुक्रवारी कृती समितीचे आंदोलन सुरू होते. कार्यकर्ते टोल न भरण्याचे आवाहन करणारी स्टिकर्स वाहनांना चिकटवत होते. तेव्हा आयआरबीच्या एका कर्मचाऱ्याने कृती समितीच्या कार्यकर्त्यांस अरेरावी केली.    
या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, अशोक पोवार,किसन कल्याणकर, प्रसाद पोवार आदींनी टोल नाक्याजवळ बंदोबस्तासाठी असलेले पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांची भेट घेतली. आयआरबी कंपनी गुंडांकरवी टोल वसुली करत असतांना तो रोखण्याऐवजी त्यांचे कर्मचारी कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकत आहेत, अशी माहिती साळोखे यांनी इंगवले यांना दिली. त्यातून कृती समितीचे कार्यकर्ते व पोलीस अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी हुज्जत घालणाऱ्या कृती समितीच्या कार्यकर्त्यांना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याकारणावरून अटक केली. या सर्वाना राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. पोलीस निरीक्षक इंगवले हे गेले आठ दिवस आर.के.नगर टोलनाका येथे बंदोबस्तासाठी होते. ते आजच शाहू टोल नाका येथे बंदोबस्तासाठी आले होते. इचलकरंजीहून कोल्हापूरला बदली झालेल्या इंगवले यांना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची ओळख नसल्याची माहिती नसल्याने वाद उद्भवल्याचे सांगण्यात येते.    
दरम्यान, शिवसेनेने आज आर.के.नगर टोल नाका येथे खर्डा-भाकरी आंदोलन केले. जनता खाते खर्डा-भाकर- आयआरबी-शासन खाते तुप-साखर अशा आशयाचे फलक शिवसैनिकांनी तेथे लावले होते. तशा घोषणा देत त्यांनी निदर्शने केली. जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी टोल न भरण्याचे आवाहन वाहनधारकांना केले. यानंतर शिवसैनिकांनी खर्डा-भाकरी खात आंदोलन केले. तर, श्रीखंड-पुरीचे ताट त्यांनी टोल नाक्याजवळ ठेवले होते.