अडीच वर्षांच्या मुलीचा नऊ महिन्यांनी शोध लावण्यात पोलिसांना यश
दादर रेल्वे स्थानकात स्वत:च्या मुलीला सोडून देणारी एक महिला आणि तिच्या प्रियकराला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने दादर रेल्वे स्थानकावर सोडून दिलेल्या तिच्या अडीच वर्षांच्या मुलीला तब्बल नऊ महिन्यांनी पोलिसांनी शोधून काढले.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील सिल्लोड तालुक्यात सचिन लोहाडे (२७) आणि शीतल लोहाडे (२४) हे शेतकरी दाम्पत्य राहत होते. शीतलचे पुण्यातील अहमद कादर शेख (३२) या तरुणाशी प्रेमसंबध होते. गेल्या वर्षी एप्रिल २०१२ मध्ये शीतल आपली अडीच वर्षांची मुलगी विद्या हिला घेऊन माहेरी जाते, असा बहाणा करून ती घरातून पळून गेली. आपली पत्नी आणि मुलगी बेपत्ता आहे, असे समजून सचिनने सिल्लोड पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, अहमदसोबत पुण्यात राहणाऱ्या शीतलने सप्टेंबर २०१२ मध्ये दादर स्थानकात विद्याला सोडून दिले होते.
पोलिसांना संशय येऊ नये म्हणून काही दिवसांपूर्वी अहमद आणि शीतलने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात येऊन आपली मुलगी दादर स्थानकातून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. अहमदच्या बोलण्यात पोलिसांना विसंगती जाणवल्याने त्याची अधिक चौकशी केली असता आपणच दादर स्थानकात विद्याला सोडून दिल्याची कबुली या दोघांनी दिली. पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
‘दोघांना अटक केली असली तरी आमच्यासमोर बेपत्ता असलेल्या विद्याचा शोध घेण्याचे खरे आव्हान होते, असे परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी माहिती मिळवून विद्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, पोलिसांना फुल बाजारातील एका महिलेकडे एक बाळ असल्याची माहिती मिळाली होती. त्याचा तपास करून पोलिसांनी उल्हासनगर येथून उषा या महिलेला ताब्यात घेतले. तिला विद्या दादर स्थानक परिसरात सापडली होती. तिने कुणालाही न सांगता आपल्या घरी नेऊन विद्याचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला होता, असे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी सांगितले.
विद्याला तिचे वडील सचिन लोहाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले असून शीतल आणि तिच्या प्रियकराची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. शीतल आणि अहमद यांना अनैतिक संबंधातून दुसरी मुलगी झाली होती. त्यामुळे त्यांनी विद्याला रस्त्यात टाकून देण्याचा अघोरी निर्णय घेतला होता, असे उपायुक्त कुलकर्णी यांनी सांगितले. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उनवणे, पोलीस निरीक्षक बने आणि रुचणकर आदींनी विद्याचा शोध घेण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.