09 March 2021

News Flash

आसोदा दंगल: संशयितास पोलिसांचे अभय

संशयित निलंबित पोलिस कर्मचारी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यामुळे राज्यात प्रसिद्ध असलेल्या आसोदा गावात अलीकडेच झालेल्या दंगलीतील मुख्य संशयितास पोलीस प्रशासन पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप

| May 1, 2013 02:22 am

संशयित निलंबित पोलिस कर्मचारी
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यामुळे राज्यात प्रसिद्ध असलेल्या आसोदा गावात अलीकडेच झालेल्या दंगलीतील मुख्य संशयितास पोलीस प्रशासन पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
शहरापासून अवघ्या चार किलोमीटरवर असणाऱ्या आसोद्यात शुक्रवारी मध्यरात्री दंगल उसळली. गावातील यात्रोत्सवानिमित्त तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. तमाशा रंगात आला असताना तरुणांचा एक गट पुढील रांगेत येऊन बसला. एकाने त्यांना हटकले. त्यातून वाद वाढत गेला. गावभर अफवा पसरून दंगल भडकली.
दंगलीत लाठय़ा-काठय़ा, दंडुक्यांचा वापर, दगडफेक, दुकानांची मोडतोड तसेच गावठी बंदुकीतून गोळीबार झाल्याचे सांगण्यात येते. दंगलीमुळे गावातील दोन समाजांत असलेली तेढ आणखीच वाढली. पाच जण जखमी होऊन पोलिसांनी पाच संशयितांनाही अटक केली.
निवडणूक किंवा इतर कारणावरून गावात अनेकदा दोन गटांत वाद उद्भवलेले आहेत. निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करण्यापर्यंतच्या घटना या तंटामुक्ती अभियानाचे सदस्य असलेल्या गावात घडल्या आहेत. अशा या संवेदनशील गावातील यात्रोत्सव आणि त्यात तमाशाचा फड म्हणजे वाद होणारच हे ठरलेले असताना पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.
तमाशाच्या फडात पुढे बसणाऱ्यांना हटकणारी व्यक्ती रवींद्र देशमुख ही होती. त्यानेच वाद उकरून काढला. दंगलीला सुरुवात केली. पोलिसांसमक्ष लोकांना दंडुक्याने बदडून काढले. स्वत:जवळील गावठी बंदुकीतून गोळीबार केला अशी माहिती मिळते.
देशमुख हा मुंबई पोलीस विभागातील निलंबित नाईक असून कारवाई झाल्यापासून तो जळगाव शहरात राहतो तसेच आसोदा हे मामाचे गाव असल्याने तेथे त्याचे सातत्याने जाणे-येणे असते. तीन वर्षांपूर्वी आसोदा ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर एका सदस्याचे अपहरण करण्यात आले होते. त्या प्रकरणात देशमुखचा सहभाग होता असे सांगण्यात येते.
निलंबित असलेल्या या पोलिसाचे आसोद्यातील दंगलीशी थेट संबंध असल्याचे तसेच त्याने गोळीबार केल्याचेही ग्रामस्थ सांगतात. परंतु गोळीबाराचा उल्लेखच पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्य़ात नाही. त्यामुळे पोलीस आपल्या निलंबित सहकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
संशयितांना न्यायालयीन कोठडी मिळाली व लगेच त्यांना जामीनही मिळाला. गोळीबार हा गंभीर विषय असताना पोलिसांनी याचा तपास होणे आवश्यक का समजले नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
आसोद्यात तंटामुक्ती समिती असून ओ. पी. भोळे समितीचे अध्यक्ष आहेत. तथापि ही समिती फक्त कागदावरच असून वास्तवात तिचे अस्तित्व फारसे दिसत नाही. वादाला जेव्हा सुरुवात झाली त्या वेळी लागलीच वाद मिटविण्याचा प्रयत्न न करता पोलीस निघून गेले होते. त्यामुळे गावाची शांतता भंग करणाऱ्यांची संपूर्ण चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2013 2:22 am

Web Title: asoda ritos police not takeing action against suspect
टॅग : News
Next Stories
1 काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारे धान्य जप्त; नऊ जणांना अटक
2 सिन्नरच्या उद्योगांना पाणी टंचाईचा फटका
3 लाभक्षेत्रातील पिण्याचे नियोजन कोलमडणार
Just Now!
X