मराठवाडा साहित्य परिषदेने यंदाही दोन विशेष पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. नटवर्य लोटू पाटील नाटय़पुरस्कार वामन केंद्रे यांना, तर यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार रामचंद्र नलावडे यांना जाहीर झाला आहे. येत्या ३१ मार्चला पुरस्कारांचे वितरण होईल. ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह, पुष्पहार व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
वामन केंद्रे हे बीड जिल्ह्य़ातील असून, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाटय़शास्त्र विभागात त्यांनी नाटय़शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण नवी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे घेतले. ‘झुलवा’ व ‘एक झुंज वाऱ्याशी’ या नाटकांचे दिग्दर्शन केले. हिंदी नाटकांचेही दिग्दर्शन केले. मुंबई विद्यापीठ संचालकपदी काम करीत असताना नुकतीच ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या संचालकपदी त्यांची निवड झाली. बीड जिल्ह्य़ातील दरडवाडी ते दिल्ली हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. याची नोंद घेऊन ‘मसाप’ने या सन्मानासाठी त्यांची निवड केली.
वाङ्मयासाठी दिला जाणारा यशवंतराव चव्हाण पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्य़ातील वेरळ खेडय़ातून आलेल्या रामचंद्र नलावडे यांना जाहीर झाला. महसूल खात्यात तलाठी ते कार्यकारी दंडाधिकारी या पदांवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीवर त्यांनी लेखन केले. ‘माझ्या मना बन दगड’ आत्मकथनात आलेले-पाहिलेले अनुभव खऱ्या नावांनिशी त्यांनी पुस्तकात मांडले. समाजातील नोकरवर्गाचे विदारक दर्शन या पुस्तकातून त्यांनी घडविले. या व्यतिरिक्त त्यांची दगडफोडय़ा, झगडा ही आत्मकथने, ६ कथासंग्रह व ६ कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.