परांडा तालक्यातील सोनारी मठाचे मठाधिपती विश्वागिरी महाराज (७०) यांच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूबद्दल तक्रारी प्राप्त झाल्याने त्याची दखल घेत पोलिसांनी करमाळा तालुक्यातील चांदगुडे वस्ती येथील महाराजांची समाधी खोदून महाराजांच्या मृतदेहाचा सांगाडा काढला. सोलापूरच्या छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालयात शवविच्छेदन  करण्यात आले असून पुण्याच्या न्यायवैद्यक रासायनिक शाळेचीही मदत घेण्यात आली आहे.
करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवरून करमाळा पोलिसांकडे तपासाची मागणी केली होती. त्यानुसार विश्वागिरी महाराजांची समाधी चार वर्षांनंतर पुन्हा खोदण्यात आली. करमाळ्यातील विजय बाबासाहेब चांदगुडे यांच्या वस्तीवर २००८-०९ साली विश्वागिरी महाराज वास्तव्य करीत होते. त्या वेळी त्यांची उपासमार झाली व त्यांचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशा तक्रारी आता चार वर्षांनंतर पुढे आल्या. महाराजांकडे असलेले सोने-चांदीचे दागिने गायब झाले, अशीही तक्रार करण्यात आली. मात्र चार वर्षांपूर्वी महाराजांच्या मृत्यूची घटना घडली त्या वेळी कोणीही अशी तक्रार केली नव्हती.
करमाळा पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करीत तपास हाती घेतला आहे. निवासी तहसीलदार एस.आर. दांडगे व पोलीस निरीक्षक भुवनेश्वर घनदाट यांच्या उपस्थितीत महाराजांची समाधी खोदण्यात आली. पुढील तपासासाठी पोलिसांना न्यायवैद्यक तज्ज्ञांचा अहवालावर अवलंबून राहावे लागणार आहे.