पुणे विद्यापीठातील रिफेक्ट्रीमधील जेवण यापुढे बायोगॅसवर तयार होणार असून सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीची झळ कमी करण्यासाठी विद्यापीठ बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याच्या विचारात आहे. काही दिवसांपूर्वी सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीची झळ विद्यापीठालाही बसत आहे. त्यावर उपाय म्हणून विद्यापीठामध्ये आता बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीमध्ये रोज मोठय़ा प्रमाणावर ओला कचरा तयार होतो. त्या कचऱ्यापासून इंधन निर्मिती करण्याच्या विचारात विद्यापीठ आहे. बायोगॅस प्राधान्याने रिफेक्ट्रीमध्ये जेवण तयार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यानंतर रिफेक्ट्रीमधील दिवे आणि इतर गरजांसाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता रा. वि. पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीला व्यावसायिक दराने सिलेंडर देण्यात येतात. त्यामुळे सध्या प्रत्येक जेवणामागे फक्त इंधनावर सरासरी चार ते पाच रुपये खर्च होतो. बायोगॅस प्रकल्पामुळे हा खर्च खूप कमी होणार आहे. त्या शिवाय इंधनाचीही बचत होणार आहे. या प्रकल्पावर विद्यापीठाची कार्यवाही सुरू आहे.’’