शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच स्मारक उभारावे या साठी मागील सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी मंजूर केलेल्या ठरावाची फाईल गायब झाल्याचा मुद्दा गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. माजी महापौर अशोक वैती यांनी हा मुद्दा उपस्थित करताच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्यांनी आक्रमक रुप धारण केले. विशेष म्हणजे, बाळासाहेबांच्या स्मारकाविषयी विरोधी बाकावरील सदस्यांनी रुद्रावातार धारण केला असताना सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक मात्र शांत बसून होते.
या फाईलबाबत माहिती नाही, असे सांगणाऱ्या महापौर हरिश्चंद्र पाटील यांनाही विरोधकांनी यावेळी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधी बाकांवरून बाळासाहेब अमर रहे, बाळासाहेब परत या..परिस्थिती बघा, अशी घोषणाबाजी करुन सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्नही करण्यात आला. दरम्यान, ठरावाच्या फाईलच्या मुद्दय़ावरून महापौर अडचणी आले असल्याचे पाहून शिवसेना नगरसेवकांनी शांत राहाण्याची भूमिका घेतल्याचे चित्र होते.
ठाणे महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रभाग समितीनिहाय झेरॉक्स मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी प्रभाग सुधारणा तसेच नगरसेवक निधीच्या ठरावास मंजुरी देण्यात आली. मात्र, अद्यापही ठरावाची प्रत प्रशासनाला मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही त्याच्या या मुद्दय़ाचे समर्थन केल्याने काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळा तसेच स्मारकाचा ठराव झाला, त्याचे काय झाले, अशी विचारणा केली. त्यावर आमच्याकडे प्रस्ताव आला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यावर प्रस्तावावर सही करून तो पुढे पाठवून दिल्याचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सांगितले. एकूणच ठरावाची फाईल गेली कुठे यावरुन सत्ताधाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे लक्षात येताच बाळासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळा तसेच स्मारकाचा ठराव गेला कुठे, असा सवाल करत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यावर ठरावाची फाईल शोधून आणण्यास सांगितली आहे, असे महापौर पाटील यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक अधिकच आक्रमक झाले. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची फाईल महापौर लपवून ठेवीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुमारे तासभर हा गोंधळ सुरू होता. महापौरांच्या कार्यालयातून ठरावाची फाईल आणण्यात आल्यानंतर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक शांत झाले.  
प्रभाग सुधारणा तसेच नगरसेवक निधीचा ठरावाच्या फायली गेल्या कुठे, असा सवाल काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला. त्यावर या फायली आमच्यापर्यंत आल्या नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी महापौर हरीश्चंद्र पाटील हे जाणुनबुजून फाईल लपवून ठेवत असल्याचा आरोप केला. तसेच या फायलींवर सभेत सह्य़ा करण्याची मागणी केली. मात्र, महापौर जेवणाची सुट्टी देऊन निघून गेले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.