एसटी प्रवास भाडे देताना सुट्टय़ा पैशाच्या कारणावरून एका एसटीच्या महिला वाहकाला दोघा मायलेकाने बेदम मारहाण केल्याची घटना सोलापूर एसटी बसस्थानकात घडली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुनंदा भारत रणशिंगे (वय २३, रा. उदगीर, जि. लातूर) असे जखमी महिला वाहकाचे नाव आहे. दुपारी चारच्या सुमारास त्या एसटी बसमध्ये कर्तव्य बजावत असताना प्रवाशांकडून प्रवासभाडय़ाची पैसे घेऊन तिकिटे देत होत्या. आपल्या जवळ होते तेवढे सुटे पैसे इतर प्रवाशांना दिल्याने पुन्हा सुटे पैसे त्यांच्याजवळ शिल्लक नव्हते. वाहक सुनंदा रणशिंगे यांनी सुटे पैसे द्या, असे म्हटल्यावर संतापलेल्या कोमल सुभाष गावडे (वय ५०) व तिचा मुलगा राहुल गावडे (वय २५, रा. मंगळवेढा) या मायलेकाने भांडण काढले व त्यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.