राजकीय क्षेत्रातील मैत्र दुरावले तरी सहकारातील आपुलकी कायम राहिली. चार दशकांहून अधिक काळातील केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे संबंध हे असे कटूगोड राहिले. राजकारणाच्या पलीकडे पाहण्याचा पवार यांच्या गुणग्राहकतेचा परिचय म्हणूनच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी आवाडे यांच्या झालेल्या निवडीकडे पाहिले जाते. अर्थात, पवारांच्या कोणत्याही कृतीमागे व्यापक हेतू लपला असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आवाडे यांना साखर महासंघाचे मानाचे अध्यक्षपद सोपविणे हा केवळ त्यांच्या सहकारातील ज्येष्ठत्वाचा गौरव आहे की साखरेच्या पट्टय़ातील दक्षिण महाराष्ट्रातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याची ही साखरपेरणी आहे, यावरून तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
कृषिप्रधान भारतातील ऊस-साखर क्षेत्राचे स्थान अनन्यसाधारण आहे. गेले दशकभर तर ऊस-साखरेच्या दरावरून शेतकरी व कारखानदारातील संघर्ष शिगेला पोहोचला असताना याची झळ ग्राहक, सामान्य नागरिकांनाही बसल्याचे दिसते. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर साखर कारखानदारांचे प्रतिनिधी राज्यशकट हाकत असल्याचे म्हटले जाते. इतके या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यासारखे आहे. यामुळेच की काय साखर कारखान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांवर शरद पवार यांचे गेले अनेक वर्षे एकहाती वर्चस्व कायम राहिले आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, महाराष्ट्र राज्य, साखर कारखाना संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट (व्ही.एस.आय.) या संस्थांची सूत्रे कोणाकडे सोपवायची याचा निर्णय पवारच काळजीपूर्वक घेताना दिसतात. या संस्थांचा विकास, साखर उद्योगाचे हित, सहकाराचे महत्त्व टिकविणाऱ्या मातब्बर व्यक्तीकडे त्याची सूत्रे सोपवताना पवारांनी राज्यभरातील सहकाराचा समतोल सांभाळतानाच राजकारणाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी बाळगली आहे. आवाडे यांची ही निवड त्याचाच भाग असल्याचे उभयतांचे संबंध पाहताना जाणवते.
पवार-आवाडे हे दोघेही यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. पवारांनी आपली ताकद आवाडे पिता-पुत्रामागे अनेकदा उभी केली आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे व त्यांचे सुपुत्र प्रकाश आवाडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले, ते पवारांच्या पाठबळामुळे. इचलकरंजी परिसरात सहकाराचे जाळे पेरताना पवारांची मोलाची मदत झाली आहे. पूर्वी पवार कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी कल्लाप्पाण्णा आवाडे तथा सावकार यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला. पवारांच्या मनातला त म्हणजे कोणता ताकभात आहे, हे जाणण्याचे मर्म सावकारांकडे होते.
इतके घनिष्ट संबंध असतानाही पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेचा निर्णय घेतला तेव्हा आवाडे पिता-पुत्र त्यांच्यासोबत गेले नाहीत. पूर्वी पवारांसोबत जाऊन काँग्रेस पक्ष सोडल्यामुळे काय खुपते याचा अनुभव असल्याने आवाडे काँग्रेस पक्षातच राहिले. याचे पुढे बरेवाईट परिणाम होत राहिले. दोन वेळा खासदार झालेले आवाडे तिसऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांच्याकडून पराभूत झाले.
पवार-आवाडे परस्परविरोधी पक्षात गेल्या दहा-बारा वर्षांपासून आहेत. मात्र काही बाबतीत उभयतांचे संबंध सौहार्दाचे राहिले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, व्ही.एस.आय. या पवारांचे वर्चस्व असलेल्या संस्थांत कल्लाप्पाण्णा आवाडेंचे स्थान कायम राहिले. तर प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी टेक्स्टाईल क्लस्टर यूआयडीएसएसएमटी, आवाडे हायटेक टेक्स्टाईल पार्क, डीकेटीईचे एक्सनल सेंटर, केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट असलेले टेक्स्टाईल क्लस्टर यांसारखे प्रकल्प पवारांपुढे सादर केल्यावर त्यांनी भरीव मदत केली.
देशाच्या व राज्याच्या राजकारणात पवारांचे स्वप्न मोठे आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या वाढविण्यावर त्यांनी भर दिला आहे. गत लोकसभा निवडणुकीवेळी कोल्हापूर जिल्हय़ातील दोन्ही जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या होत्या. एका जागेवर तर पवार व साखर उद्योगाच्या प्रगतीला अडसर ठरणारे खासदार राजू शेट्टी हा वक्रीचा ग्रह आपले स्थान भक्कम करीत आहे. शेट्टी यांना रोखण्यामध्ये आवाडे यांची मदत घेण्याचा पवारांचा इरादा दिसतो. तर दुसरीकडे पवारांच्या प्रत्येक कोल्हापूर दौऱ्यात आवाडे यांची भेट झाल्यावर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या झळकत राहिल्या आहेत. हे सारे संदर्भ तपासता राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्षपद आवाडे यांच्याकडे सोपवताना पवारांनी नेमका कोणता विचार केला असावा, याचा अन्वयार्थ लागू शकतो. पवारांची ही साखर पेरणी गोड ठरणार की सहकारातील सलोख्याच्या संबंधांना मजबुती मिळणार त्याचे उत्तर नजीकच्या काळात मिळणार आहे.