जवळपास १५ हजार पणत्या एकाचवेळी प्रज्वलित केल्याने निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान उजळून निघाले. शहरातील विविध संस्थांनी आयोजित दीपोत्सवात ठिकठिकाणी विद्युत रोषणाई व नेत्रदीपक आतषबाजी केली.
निगडीतील मधुकर पवळे प्रतिष्ठानकडून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यातील भेटीवर आधारित शिल्पसमूहाच्या ठिकाणी होणाऱ्या दीपोत्सवाचे यंदा ११ वे वर्षे होते. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यानंतर, नागरिकांनी एकेक दिवा पेटवून या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी महापौर मोहिनी लांडे, माजी महापौर आर. एस. कुमार, माजी नगरसेविका सुमन पवळे, दत्ता पवळे, किरण चोपडा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संतोष कवडे, विजय गांगर्डे, रोहित कडेकर, शिरीष राऊत, हेमंत सटाणकर, अनिकेत चव्हाण यांनी केले होते.
याशिवाय, चिंचवड येथील शिवाजी व्यायाम मंडळाच्या पटांगणात सुनेत्रा प्रतिष्ठानच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आमदार जगताप यांच्या हस्ते प्रारंभ झाला. अवघ्या काही क्षणात उद्यानात हजारो दिवे प्रज्वलित झाले. माजी महापौर अपर्णा डोके व नीलेश डोके यांनी आयोजन केले होते.
चिंचवड भोईरनगर येथे कलाकार महासंघ प्रस्तुत लख-लख चंदेरी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले. जितेंद्र अभ्यंकर, पद्मजा लामरूड, मधुसुदन ओझा, स्वप्ना काळे यांनी रसिकांची दाद मिळवली. संयोजन नाटय़ परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले. अभय गोखले यांनी निवेदन केले.