पर्यावरणाचा समतोल व जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर शेतकऱ्यांनी देशी बी-बियाण्यांचा वापर करावा व विदेशी बी-बियाण्यांच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्याचा एकमुखी ठराव भुयेवाडी (ता.करवीर)येथील ग्रामसभेत घेण्यात आला. हा ठराव यशवंत चौगले यांनी मांडला. अध्यक्षस्थानी सरपंच राणी पाटील होत्या.     
माणिक पाटील यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये असणारे नियम भौगोलिक परिस्थितीनुसार शिथिल करण्याची मागणी केली. मातीची जमीन खुदाईसाठी असणारा दर खडकाळ जमीन खुदाईसाठी सुध्दा आहे. हा दर परवडणारा नाही. त्यामुळे या विषयीच्या नियमात सुधारणा करण्याचा ठराव करण्यात आला. त्याचबरोबर भुयेवाडी गावची वाढती लोकसंख्या, वाढते वीज बिल, कामगार पगार यांचा विचार करून पाणीपट्टी ४५० वरून एक हजार रूपये करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या वेळी उपसरपंच भीमराव नांगरे, तानाजी चौगले, युवराज पाटील, शरद पाटील, उत्तम पाटील, संपत शिंदे, श्रीकांत पाटील, सुजाता माने,पूजा खोत आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी बी.डी.पाटील यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली.