भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीतर्फे तांबवे (ता. कराड) या गावाला विमाग्राम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तांबवे ग्रामपंचायतीच्या सभागृहात  झालेल्या कार्यक्रमात सरपंच प्रदीप पाटील यांनी विमाग्राम पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी एलआयसीचे शाखा व्यवस्थापक अरूण मिरगे, आनंद कुलकर्णी, अशोक यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब पाटील, माजी उपसरपंच आनंदा ताटे, ग्रामसेवक ठोके, रविंद्र ताटे, सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रदीप पाटील म्हणाले की, एलआयसीच्या पॉलिसीवर लोकांचा विश्वास आहे. गुंतवणूक बचत व संरक्षण यांच्या हमीमुळे सर्वसामान्यांचा एलआयसीकडे ओढा आहे. याशिवाय एलआयसीने सामाजिक बांधिलकीही जपली आहे. त्याद्वारे ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे ब्रीद सार्थ ठरते. विमा प्रतिनिधी डॉ. अनिल पाटील यांनी गावच्या विकासाला हातभार लावला आहे.
अरूण मिरगे म्हणाले की, घरोघरी विमा पॉलिसी असणे गरजेचे आहे. तांबवे गावाकडून एलआयसीला मिळालेला प्रतिसाद समाधानकारक आहे. ग्रामस्थांनी एलआयसीच्या पॉलीसी घेऊन बचतीसह भविष्यकालीन तरतुदी कराव्यात, असे आवाहन केले.
विकास अधिकारी एस. जी. कुलकर्णी म्हणाले की, एलआयसी प्रतिनिधी डॉ. अनिल पाटील यांनी पॉलीसी विकण्याबरोबरच विमाधारकांना सेवाही चांगल्या पध्दतीने दिली आहे. त्यामुळे तांबवे गावातील जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद दिला आणि तांबवे गाव विमाग्राम झाले. आनंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. याचवेळी ग्रामपंचायतीस एलआयसीकडून २५ हजारांचा धनादेश देण्यात आला. विमा प्रतिनिधी डॉ. अनिल पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सतीश यादव यांनी सूत्रसंचालन केले. एलआयसीचे विक्री व्यवस्थापक अशोकराव यादव यांनी आभार मानले.