निराश्रित बालकांच्या संस्कारक्षम संगोपन केंद्रात, म्हणजेच स्थानिक ‘आश्रय’ या अनाथाश्रमात चार बालकांचा संयुक्त वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांनी नटलेला हा तासभराचा कार्यक्रम तेथील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि उपस्थितांना एका सामाजिक दायित्वाच्या कार्यात सहभागी झाल्याचे समाधानही देऊन गेला.
 संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे हा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डिसेंबर ते मार्च दरम्यान आलेल्या या चार बालकांचा वाढदिवसाचा आनंद साऱ्यांनीच लुटला. मावशी केळकर स्मृती प्रतिष्ठानकडून संचालित ‘मैत्रेय’ या अनाथलयाच्या मुलीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झााल्या आणि त्यांनीही ‘आश्रय’च्या मुलांसाठी भेटवस्तू आणल्या. अशा या पारिवारिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक वसंत धोटे, चांदा पब्लिक स्कूलच्या प्रधानाचार्या भावना सोनकांबळे, चंद्रकांत अग्रवाल, ‘आश्रय’चे सचिव अ‍ॅड. आशिष धर्मपुरीवार, संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मेंढे, सचिव सुभाष कासनगोट्टवार प्रभृती मंचावर उपस्थित होते.
यावेळी शालिक इंगळे, दिलीप पुंगाटी, संतोष विडप्पी आणि गणेश पुंगाटी या बालकांना नवीन कपडे देऊन मंजुश्री कासनगोट्टवार, भारती नेरलवार, अमृता रामगिरवार यांनी औक्षवण केले. तत्पूर्वी, ‘आश्रय’च्या विद्याथ्यार्ंसाठी वनपाल निलिमा खोब्रागडे यांनी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धामध्ये विजयी ठरलेल्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. ‘मैत्रय’च्या विद्यार्थिनींना सलवार सूटचे वितरण करण्यात आले.
छात्रावास प्रमुख पार्वती गव्हर्नर यांनी अमृता रामगिरवार यांच्याकडून ही भेटवस्तू स्वीकारली, तर, संगीता गोविंदवार यांनी आणलेल्या भेटवस्तूंचेही यावेळी वितरण करण्यात झाले. भावना सोनकांबळे यांनी सुरेख गोष्टी सांगून मुलांना संस्कारित केले. उंच भरारी घेण्याचे बळ तुमच्यात आहेत. केवळ ते ओळखण्याची गरज आहे, असा आत्मविश्वासही त्यांच्यात जागवला. संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानने सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा संकल्प सोडला असून मामला येथील नेत्रचिकित्सा शिबिराच्या यशानंतर संकल्पाचा हा दुसरा महत्वाचा कार्यक्रम होता, अशी माहिती सुभाष कासनगोट्टवार यांनी प्रास्ताविकातून दिली. नागोसे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय रामगिरवार यांनी केले, तर आभार महेश मेंढे यांनी केले. मुकुंद पाठक, अ‍ॅड. आशिष धर्मपुरीवार,थोटे, आम्रपाली चिमूरकर, संगीता गोविंदवार, चंद्रकांत अग्रवाल, नागोसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.