तुमच्याकडील कोणतीही नोट खरी असेलच याची शाश्वती तुम्ही देऊ शकणार नाही. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएएसने भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी बनावट नोटा वितरीत करण्याचे षड्यंत्र पद्धतशीरपणे राबविले आहे. मात्र, बनावट नोटांचा हा कारखाना पाकिस्तानात नव्हे तर बांगलादेशमध्ये असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यात भर म्हणजे या बनावट नोटा केवळ बांगलादेशमार्गे येतात असे नाही तर आता भारतातही अनेक हस्तकांना खोटय़ा नोटा बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
२००९ साली नेपाळमार्गे बनावट नोटा आणल्या जात. आता त्या बांगलादेशातून आणल्या जात असल्याचे उघड झाले आहे. तेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनावट नोटा छापल्या जात असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. आयएसआयने भारतातही आपल्या हस्तकांना प्रशिक्षण देऊन कामाला लावले आहे.
किरकोळ बाजारात विक्री
या नोटा भारतात खपविण्याचे एक तंत्रच या हस्तकांनी निर्माण केले आहे. एकाच वेळी खूप नोटा दिल्यास संशय येऊ शकतो. त्यामुळे बनावट नोटा वितरीत करणाऱ्या टोळीने शंभरच्या नोटा वितरीत करण्याचे तंत्र अवलंबले आहे. मानखुर्द पोलिसांनी काही दिवसांपूर्वी सात जणांच्या एका टोळीला अटक केली. या टोळीने पाचशे आणि हजारांच्या नोटांऐवजी शंभरच्या नोटा वितरीत करण्यास सुरवात केली होती. या टोळीचा म्होरक्या दिल्लीहून बनावट नोटा छपाईचे तंत्र शिकून आला होता. तो शंभरच्या नोटा सहकाऱ्यांना द्यायचा. मग ते किरकोळ विक्रेत्यांकडे जाऊन ही नोट खपवायचे. त्यासाठी गर्दी असेल असे ठिकाण निवडले जायचे. त्यामुळे विक्रेते पटकन नोट घेऊन उरलेले पैसे देऊन टाकायचे. दहा वीस रुपयांची भाजी वा तत्सम वस्तू बनावट शंभर रुपये देऊन खरेदी केली जायची. या टोळीने तब्बल १० लाखांच्या बनावट नोटा वसईच्या वालीव येथील एका घरात प्रिंटर आणि स्कॅनरच्या सहाय्याने छापून घेतल्या होत्या. त्यापैकी सव्वा लाख रुपये त्यांनी अशा पद्धतीने वितरीत केले होते.
यासंदर्भात मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हरिदास राजपूत यांनी सांगितले की, या टोळीकडून आतापर्यंत सव्वानऊ लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे बाजारात खपवलेल्या सव्वा लाखांपैकी पन्नास हजाराच्या बनावट नोटाही परत मिळविण्यात यश आले आहे. घरातच नोटा छापल्या जात असतील तर ही खूप मोठी धोक्याची सूचना आहे, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली.
बांगलादेश मुख्य केंद्र
पाकिस्तानमधून बनावट नोटा किंवा माणसे पाठवणे कठीण असते. पण बांगलादेशातून घुसखोरीने भारतात मजूर पाठवणे तुलनेत सोपे असते. मजुरांचाच मग या कामासाठी वापर करण्यात आला. मुंबई गुन्हे शाखेच्या विविध युनिटनी गेल्या दोन तीन वर्षांत अशा अनेक टोळ्या उघडकीस आणल्या. सगळ्या टोळ्यांचे मूळ बांगलादेशातच जाऊन पोहोचते.
यासंदर्भात गुन्हे कक्ष १२ चे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद खेतले यांनी सांगितले की, बांगलादेशी मजूर एजंटच्या मार्फत सीमेवरून घुसखोरी करतात. ते अनेक शहरांत मजूर म्हणून काम करतात. त्यांच्यामार्फत या नोटा पाठविल्या जातात. हे मजूर प्रथम जोडधंदा म्हणून नोटा वितरित करतात. पण नंतर त्यात खूप फायदा होत असल्याने तोच त्यांचा मुख्य व्यवसाय बनतो. मोठय़ा दुकानात नोटा ओळखण्याचे यंत्र असते. त्यामुळे ही मंडळी मोठी दुकाने टाळतात.
महिलांचाही सहभाग
बनावट नोटांच्या विक्रीसाठी महिलांनाही पुढे करण्यात येते. पोलिसांनी अटक केलेल्या काही टोळ्यांमधील महिलांचा सहभाग उघड झाला आहे. या बांगलादेशी महिला बाजारात लहान मुलांसह जाऊन नोटा खपवितात. महिला आणि सोबत छोटे मूल असल्याने कुणाला संशय येत नाही. शंभर रुपयांमागे त्यांना तीस ते पस्तीस रुपये कमिशन मिळते. त्यामुळे भरपूर नोटा बाजारात खपवतात.
बनावट नोटांचा सुळसुळाट थांबविण्यासाठी केंद्र सरकारने नवीन तंत्रज्ञानाने नोटा छापण्यास सुरवात केली. पण बनावट नोटांची टोळी यापेक्षा एक पाऊल पुढेच आहे. त्यांच्याकडे असलेल्या नोटा बनावट आहेत हे ओळखणे फार कठीण जाते, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आयएएस या संघटनेची आधुनिक यंत्रणा अशा प्रकारे भारतीय तंत्रज्ञानाप्रमाणे नोटा बनविते. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे.